भारतामध्ये स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटच्या अधिकृत किंमती जाहीर
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)। एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्स अंतर्गत येणाऱ्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवेने अखेर भारतासाठी आपले अधिकृत रेसिडेन्शियल प्लॅन जाहीर केले आहेत. दूरस्थ आणि नेटवर्क कमजोर असलेल्या भागात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्याच्य
Starlink satellite internet


मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)। एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्स अंतर्गत येणाऱ्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवेने अखेर भारतासाठी आपले अधिकृत रेसिडेन्शियल प्लॅन जाहीर केले आहेत. दूरस्थ आणि नेटवर्क कमजोर असलेल्या भागात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्याच्या उद्देशाने ही सेवा भारतात सादर करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर भारतासाठी मासिक शुल्क, हार्डवेअर किंमत आणि सेवेच्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती अपडेट केली आहे.

भारतामधील स्टारलिंक रेसिडेन्शियल प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना दरमहा ८,६०० रुपये सबस्क्रिप्शन फी भरावी लागणार आहे. याशिवाय, सुरुवातीला एकदाच ३४,००० रुपये हार्डवेअर किटसाठी खर्च करावा लागेल. या किटमध्ये सॅटेलाइट डिश, राऊटर आणि आवश्यक अ‍ॅक्सेसरीजचा समावेश असेल. कंपनीकडून ३० दिवसांचा ट्रायल पीरियडही देण्यात येणार असून, हार्डवेअर फक्त प्लग-इन केल्यानंतर लगेच इंटरनेट सेवा सुरू होईल, असा दावा करण्यात आला आहे.

स्टारलिंक सेवेअंतर्गत अनलिमिटेड डेटा देण्यात येणार असून ९९.९ टक्क्यांपेक्षा अधिक अपटाइमचे आश्वासनही कंपनीने दिले आहे. ही सेवा कोणत्याही हवामानात कार्यक्षम राहील, असे सांगण्यात आले आहे. सोपी आणि जलद इंस्टॉलेशन प्रक्रिया असल्यामुळे ही सेवा ग्रामीण, डोंगराळ आणि दूरवरच्या भागांसाठी विशेष फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.दरम्यान, स्टारलिंक टीम भारतात आपला विस्तार वेगाने करत आहे. चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि नोएडा या शहरांमध्ये ‘गेटवे अर्थ स्टेशन’ उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. हे स्टेशन सॅटेलाइट आणि युजरच्या डिशदरम्यान दुवा म्हणून काम करतील, ज्यामुळे कनेक्शन अधिक स्थिर आणि वेगवान राहणार आहे.

याशिवाय, कंपनीने बेंगळुरू कार्यालयासाठी विविध वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या असून, भारताला जागतिक विस्तारासाठी महत्त्वाचे केंद्र मानले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. अहवालांनुसार, भारताच्या दूरसंचार विभागाने स्टारलिंकला पाच वर्षांचा परवाना दिला असून, त्यामुळे लवकरच देशात व्यावसायिक पातळीवर सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande