
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)। ॲपलचा फोल्डेबल स्मार्टफोन म्हणजेच आयफोन फोल्ड लवकरच बाजारात येणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आयफोन 17 सिरीज लॉन्च झाल्यानंतर आता आयफोन 18 सिरीजसोबतच आयफोन फोल्ड बाबत अनेक महत्त्वाचे लीक समोर आले आहेत. चीनमधील एका रिपोर्टनुसार, या आगामी फोल्डेबल आयफोनमध्ये पारंपरिक सिम कार्ड स्लॉटच दिला जाणार नाही. हा स्मार्टफोन पूर्णपणे ई सिम तंत्रज्ञानावर आधारित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जे ॲपलने याआधी आयफोन 17 सिरीजमध्येही जागतिक पातळीवर स्वीकारले आहे.
चीनमधील प्रसिद्ध टिपस्टर ‘इन्स्टंट डिजिटल’ यांनी वीबोवर दिलेल्या माहितीनुसार, आयफोन फोल्ड हा फोन फिजिकल सिम कार्डशिवाय येऊ शकतो आणि फक्त ई सिम सपोर्ट देऊ शकतो. त्यामुळे डिव्हाइस अधिक स्लिम आणि वॉटर-रेझिस्टंट बनवणे ॲपलला सहज शक्य होईल. हा बदल भविष्यातील स्मार्टफोन डिझाइनचा नवा ट्रेंड ठरू शकतो, अशीही चर्चा आहे.
डिझाइन आणि डिस्प्लेच्या बाबतीत हा फोन अत्यंत प्रीमियम असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, आयफोन फोल्ड मध्ये 5.5 इंचांचा बाह्य डिस्प्ले आणि 7.8 इंचांची फोल्डेबल इनर स्क्रीन देण्यात येऊ शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक फोल्डेबल फोनमध्ये स्क्रीनवर दिसणारी क्रीज ही मोठी अडचण असते. मात्र, ॲपलने ही क्रीज जवळपास गायब करण्याचे तंत्र विकसित केले असल्याची माहिती समोर येत आहे. जर हे खरे ठरले, तर स्मूद आणि सीमलेस डिस्प्ले अनुभवामुळे आयफोन फोल्ड इतर फोल्डेबल फोन्सपेक्षा वेगळा आणि अधिक आकर्षक ठरेल.
परफॉर्मन्सच्या बाबतीतही हा फोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असण्याची शक्यता आहे. आयफोन फोल्ड मध्ये कंपनीचे नेक्स्ट-जनरेशन A20 Pro चिपसेट वापरले जाऊ शकते. हा प्रोसेसर TSMC च्या नव्या 2nm प्रोसेसवर आधारित असेल, ज्यामुळे फोन अधिक पॉवरफुल आणि बॅटरी-एफिशिएंट होईल. याशिवाय, या डिव्हाइस मध्ये सिलिकॉन-कार्बन बॅटरी टेक्नोलॉजी दिली जाऊ शकते, ज्यामुळे फोन अधिक काळ चालेल, पण त्याचे वजन किंवा जाडी वाढणार नाही.
डिव्हाइसच्या जाडीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आयफोन फोल्ड अनफोल्ड केल्यानंतर त्याची जाडी साधारण दोन आयफोन Air एकत्र ठेवले असता जितकी होते तितकी असण्याची शक्यता आहे. फोल्डेबल सेगमेंटसाठी हा आकार तुलनेने कॉम्पॅक्ट मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे, या फोनमध्ये ॲपल पहिल्यांदाच 24 मेगापिक्सेलचा अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देऊ शकते. त्यामुळे स्क्रीनवर कोणताही कटआउट न दिसता फुल-स्क्रीन अनुभव मिळेल आणि त्याचवेळी कॅमेरा क्वालिटीही उच्च दर्जाची राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या हे सर्व तपशील लीक आणि रिपोर्ट्सवर आधारित आहेत, मात्र उद्योग क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते हा फोल्डेबल आयफोन आयफोन 18 सिरीजसोबत लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. ॲपलचा हा नवा प्रयोग स्मार्टफोन उद्योगात मोठा बदल घडवू शकतो आणि फोल्डेबल सेगमेंटमध्ये कंपनी एक नवा बेंचमार्क सेट करू शकते. ग्राहकांमध्ये या डिव्हाइसबाबत प्रचंड उत्सुकता असून, अधिकृत घोषणा येण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule