वाराणसी, 26 सप्टेंबर (हिं.स.) - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शीख समुदायाविरुद्ध वक्तव्य केले होते. दरम्यान कथित टिप्पणीविरुद्ध गांधी यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राहुल गांधींना धक्का बसला आहे.
काय आहे प्रकरण
सप्टेंबर २०२४ मध्ये, अमेरिका भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथे एका कार्यक्रमात शीख समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर भाष्य केले. त्यांनी असे म्हटले होते की, भारतात शीख समुदायाच्या लोकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा पाळण्याची परवानगी नाही, तसेच त्यांना पगडी घालण्याची किंवा गुरुद्वारांना भेट देण्याची परवानगी नाही. त्यांच्या या वक्तव्याविरोधात राजकीय वाद निर्माण झाला. तसेच गांधींविरुद्ध व्यापक निदर्शने झाली होती. या प्रकरणी ज्येष्ठ वकील आणि वाराणसीचे रहिवासी नागेश्वर मिश्रा यांनी या विधानाला प्रक्षोभक ठरवत स्थानिक सारनाथ पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी याचिका दाखल केली, परंतु कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर नागेश्वर मिश्रा यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला. तथापि, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी एसीजेएम न्यायालयाने मिश्रा यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर नागेश्वर मिश्रा यांनी वाराणसी सत्र न्यायालयात (एमपी-एमएलए स्पेशल कोर्ट) पुनर्विचार याचिका दाखल केली. पुढे २१ जुलै रोजी वाराणसी एमपी-एमएलए स्पेशल कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी नागेश्वर मिश्रा यांची याचिका स्वीकारली आणि एसीजेएमला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे निर्देश दिले. राहुल गांधींनी या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले, परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की, आता या प्रकरणाची सुनावणी वाराणसी एमपी-एमएलए कोर्टात सुरू होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी