* सामान्य नागरिकांच्या संख्या 85 टक्क्यांनी कमी
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर (हिं.स.) - ईशान्य भारतातील नक्षलग्रस्त भागाची परिस्थिती पाहिल्यास 2004–14 या काळापेक्षा 2014–24 मध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जिवितहानीत 70 टक्क्यांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे, सामान्य नागरिकांची जिवितहानी 2014–24 मध्ये 85 टक्क्यांनी कमी झाली आहे. मोदी सरकारने 12 महत्त्वपूर्ण शांतता करार राबवले आणि 10,500 सशस्त्र तरुणांचे आत्मसमर्पण नक्की करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. नवी दिल्ली येथे आयोजित, ‘भारत मंथन-2025 : नक्षल मुक्त भारत – मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल दहशतीचा अंत’ या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात ते रविवारी बोलत होते.
शाह पुढे म्हणाले, पूर्वी संपूर्ण ईशान्य भारत, देशाच्या इतर भागांपासून वेगळा पडल्यासारखा वाटत होता, पण आज तो रेल्वे, गाड्या आणि विमानसेवेने जोडला गेला आहे. मोदी सरकारने केवळ भौतिक अंतरच नाही, तर दिल्ली आणि ईशान्य भारत यातील भावनिक अंतरही कमी केले आहे. त्यामुळे आज ईशान्य भारत, शांतता आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
देशाच्या 17 टक्के भूभागावर डाव्या विचारसरणीचा लाल पट्टा पसरला होता आणि त्याचा परिणाम सुमारे 120 दशलक्ष लोकांना सोसावा लागला. त्या वेळी लोकसंख्येचा 10 टक्के भाग नक्षलवादाच्या दहशतीखाली राहत होता असे सांगत, त्यांनी स्पष्ट केले की, तुलनेत इतर दोन हिंसाग्रस्त क्षेत्रे - काश्मीर, जिथे देशाच्या एक टक्के भूभागावर दहशतवादाचा प्रभाव होता आणि ईशान्य भारत, जिथे 3.3 टक्के भूभाग अशांततेने धुमसत होता - तुलनेने कमी प्रमाणात अस्वस्थ होते. मात्र जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा मोदी सरकारने चर्चा, सुरक्षा आणि समन्वय या तीन पैलूंवर काम सुरू केले. त्या आधारावरच 31 मार्च 2026 पर्यंत देशातून सशस्त्र नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल.
नक्षलवादाला विचारधारात्मक, कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना जेव्हा भारतीय समाज ओळखेल, तेव्हाच नक्षलवादाविरुद्धची लढाई संपेल. अंतर्गत सुरक्षा आणि देशाच्या सीमांचे रक्षण, आमच्या विचारसरणीचा नेहमीच गाभा राहिला आहे. आमच्या पक्षाच्या कार्यात तीन प्रमुख उद्दिष्टे केंद्रस्थानी राहिली आहेत - देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगांचे पुनरुज्जीवन. डाव्या विचारसरणीने माजवलेल्या हिंसाचारात, 1960 च्या दशकापासून ज्यांनी आपले प्राण गमावले, प्रियजन गमावले किंवा शारीरिक-मानसिक यातना सोसल्या, त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली. पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष सत्तेत येईपर्यंत नक्षलवाद वाढला होता, पण ते सत्तेत आल्यावर लगेचच नक्षलवाद तेथून नाहीसा झाला, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी