वॉशिंग्टन , 26 सप्टेंबर (हिं.स.)। “जागतिक कामगारशक्ती ही आजची सत्यता आहे आणि जगाला तिच्या गरजेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.” असे विधान करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा नाव न घेता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रादरम्यान न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यादरम्यान, ते असेही म्हणाले कि, अनेक देश फक्त स्वतःच्या लोकसंख्येकडून कामगारांची मागणी पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे जगाला एक सुसंगत आणि कुशल जागतिक कामगारशक्ती स्वीकारावी लागेल.
जयशंकर यांनी सांगितले, “ही एक वस्तुस्थिती आहे. तुम्ही यापासून पळ काढू शकत नाही. जागतिक कामगारशक्ती ही राजकीय चर्चेचा विषय असू शकते, पण कुणीही यापासून वाचू शकत नाही. जर तुम्ही मागणी आणि लोकसंख्याशास्त्र पाहिले, तर असे लक्षात येते की अनेक देश त्यांच्या केवळ राष्ट्रीय लोकसंख्येच्या आधारावर कामगारांची गरज पूर्ण करू शकत नाहीत.”
परराष्ट्र मंत्र्यांनी असेही म्हटले की, “आपण एक अशी जागतिक कामगारशक्ती निर्माण केली पाहिजे जी अधिक स्वीकारार्ह, आधुनिक आणि कुशल असेल.” त्यांनी पुढे विचारले, “आपण जागतिक कामगारशक्तीचे असे स्वीकारार्ह, समकालीन आणि कुशल मॉडेल कसे तयार करू शकतो, जे एका वितरित जागतिक कार्यस्थळावर आधारित असेल? मला वाटते की हा आज एक फार मोठा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला शोधावे लागेल.”
जयशंकर यांचे हे वक्तव्य त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्यापार, कर आणि विशेषतः स्थलांतर धोरणांवर कडक भूमिका घेतली आहे. एच-1बी व्हिझा ही भारतातील आयटी, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी अमेरिकामध्ये नोकरी मिळवण्याचा मुख्य मार्ग राहिला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या व्हिझाचा सुमारे तीन-चतुर्थांश लाभ भारतीय व्यावसायिकांनाच होतो. या व्हिझाच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्या परदेशी तज्ज्ञांची नेमणूक करू शकतात.
मात्र ट्रम्प प्रशासनाने आता एच-1बी व्हिझावर $1,00,000 (एक लाख डॉलर) नवीन फी लागू केली आहे.ही फी आधीपासूनच असलेल्या फाइलिंग व लीगल खर्चांव्यतिरिक्त आकारली जाणार आहे. त्यामुळे हा व्हिझा खूपच महागडा होणार आहे आणि त्याचा परिणाम भारतीय व्यावसायिकांवर होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode