नवी दिल्ली , 26 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेने 1 ऑक्टोबरपासून ब्रँडेड आणि पेटंटेड औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारताने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, भारत सरकारने यावर सावधपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
रणधीर जायसवाल यांनी शुक्रवारी(दि.२६) पत्रकार परिषदेत सांगितले कि, “सोशल मीडियावर नवीन टॅरिफबाबत नोटीसेस आल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने फार्मा व इतर संबंधित उत्पादांवरील अहवाल पाहिले आहेत. संबंधित मंत्रालये आणि विभाग या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्याचा संभाव्य परिणाम अभ्यासत आहेत.” भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या एक-तृतीयांशहून अधिक औषधांचा पुरवठा भारतातून होतो. ही औषधे पेटंटखाली नसतात आणि ब्रँडेड औषधांच्या तुलनेत स्वस्त असतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्रुथ सोशल वर लिहिले, “1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंटेड फार्मास्युटिकल उत्पादनावर 100% टॅरिफ लावू, जर ती कंपनी अमेरिकेत उत्पादन युनिट स्थापन करत नसेल.” ट्रंप यांनी यासोबतच इतर वस्तूंवरही टॅरिफ लावले आहेत, ज्यामध्ये औषधांवर 100% आयात शुल्क,किचन कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीवर 50%, गादी असलेल्या फर्निचरवर 30% आणि जड ट्रकांवर 25% शुल्क लावण्यात येणार आहे. ट्रंप यांनी या टॅरिफसाठी कोणतेही स्पष्ट कायदेशीर कारण दिलेले नाही.त्यांनी फक्त एवढे म्हटले की हे “राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि इतर कारणांमुळे” आवश्यक आहे.त्यामुळे अध्यक्ष म्हणून त्यांच्या अधिकारांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ट्रंप यांचा टॅरिफ फोकस ब्रँडेड औषधांवर आहे, जे बहुतांश वेळा मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून विकले जातात. पण, उद्योग तज्ञांचे म्हणणे आहे की यात जेनेरिक औषधे समाविष्ट नसली तरी भारतासाठी धोका पूर्णपणे टळलेला नाही. भविष्यात यामध्ये बदल होऊ शकतो किंवा नवीन अटी लागू केल्या जाऊ शकतात. ट्रम्प सरकारच्या 100% आयात शुल्कामुळे, अमेरिकेत कार्यरत भारतीय फार्मा कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये डॉ. रेड्डीज, सन फार्मा, ल्यूपिन यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. विशेषतः ब्रँडेड आणि पेटंटेड औषधांवर सर्वाधिक टॅरिफ लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.जनरिक औषधांबाबतही अजून स्पष्टता नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode