मारुती सुझुकी ठरली जगातील आठवी सर्वांत मौल्यवान ऑटो कंपनी
मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेली ऐतिहासिक झेप मारुती सुझुकी इंडियाने घेतली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जागतिक पातळीवर विक्रमी यश संपादन करत जगातील आठवी सर्वात मौल्यवान ऑटो कं
Maruti Suzuki


मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेली ऐतिहासिक झेप मारुती सुझुकी इंडियाने घेतली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जागतिक पातळीवर विक्रमी यश संपादन करत जगातील आठवी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी म्हणून आपले स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, ही कामगिरी करणारी पहिली भारतीय ऑटोमोबाईल कंपनी ठरली असून, यामुळे भारताचा जागतिक वाहन उद्योगात मोठ्या ताकदीने उगम झाल्याचे चित्र दिसत आहे.

मारुती सुझुकीचे बाजार मूल्यांकन तब्बल 57.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 5 लाख कोटी रुपये) इतके झाले असून, या यशामुळे तिने अमेरिकेच्या फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्स तसेच जर्मनीच्या बलाढ्य फोक्सवॅगनसारख्या दिग्गज कंपन्यांनाही मागे टाकले आहे. सध्या जनरल मोटर्स नवव्या, फोक्सवॅगन दहाव्या, तर फोर्ड बाराव्या स्थानावर असून, त्या सर्व मारुतीच्या मागे राहिल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मारुती सुझुकीचे मार्केट कॅप आता तिच्या जपानमधील पॅरेंट कंपनी सुझुकी मोटरपेक्षा जास्त झाले आहे, जे भारतासाठी आणखी मोठा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

जगातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर एलन मस्कची टेस्ला तब्बल 1.47 ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह आघाडीवर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जपानची टोयोटा 314 अब्ज डॉलर्स, तिसऱ्या क्रमांकावर चीनची बीवायडी 133 अब्ज डॉलर्स, चौथ्या क्रमांकावर इटलीची फेरारी 92.7 अब्ज डॉलर्स, पाचव्या क्रमांकावर जर्मनीची बीएमडब्ल्यू 61.3 अब्ज डॉलर्स, तर सहाव्या क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ ग्रुप 59.8 अब्ज डॉलर्स मार्केट कॅपसह स्थिरावले आहेत. या बलाढ्य कंपन्यांच्या शेजारी आता मारुती सुझुकीने आठव्या स्थानावर भक्कम पाय रोवला आहे.

मारुतीच्या या घोडदौडीमागे अनेक कारणे असून, शेअर बाजारातील तज्ज्ञांनी त्याकडे विशेष लक्ष वेधले आहे. कंपनीने नुकतेच जाहीर केलेले तिमाही निकाल विक्रमी ठरले आहेत. मजबूत विक्री संख्या, खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन आणि बाजारपेठेत सातत्याने वाढणारी मागणी यामुळे कंपनीने नफ्यात मोठी झेप घेतली आहे. त्याशिवाय, आगामी काळात जीएसटी दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने गुंतवणूकदारांचा ऑटोमोबाईल समभागांवर विश्वास अधिक वाढला आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय ऑटो शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचा थेट फायदा मारुतीला झाला आहे.

आजवर विक्रीच्या बाबतीत अग्रस्थान मिळवणाऱ्या मारुती सुझुकीने आता आर्थिक मूल्यांकनाच्या बाबतीतही जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवून दिली आहे. ही कामगिरी केवळ कंपनीसाठीच नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. ऑटो उद्योगातील ही झेप आगामी काळात भारताच्या औद्योगिक सामर्थ्याला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande