वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये 1.02 लाख कोटींची गुंतवणूक
- आघाडीच्या जागतिक आणि देशांतर्गत कंपन्यांसोबत सामंजस्य करार नवी दिल्‍ली, 29 सप्टेंबर (हिं.स.)। अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे आयोजित ''वर्ल्ड फूड इंडिया 2025'' या कार्यक्रमाचा अभूतपूर्व गुंतवणुकीच्या बांधिलकीसह ऐतिहासिक टप्प्यावर समारोप
Investment Rs 1.02 lakh crore World Food India 2025


- आघाडीच्या जागतिक आणि देशांतर्गत कंपन्यांसोबत सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 29 सप्टेंबर (हिं.स.)। अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे आयोजित 'वर्ल्ड फूड इंडिया 2025' या कार्यक्रमाचा अभूतपूर्व गुंतवणुकीच्या बांधिलकीसह ऐतिहासिक टप्प्यावर समारोप झाला. या चार दिवसीय कार्यक्रमादरम्यान, 26 आघाडीच्या देशांतर्गत आणि जागतिक कंपन्यांनी एकूण 1 लाख 02 हजार 046.89 कोटी रुपये मूल्याच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. ही भारतात अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणांपैकी एक ठरली आहे. या सामंजस्य करारांमुळे 64,000 पेक्षा जास्त लोकांसाठी थेट रोजगार आणि 10 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींसाठी अप्रत्यक्ष संधी निर्माण होतील असा अंदाज आहे. यामुळे भारताला अन्न प्रक्रियेचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीला बळकटी मिळेल.

या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये या क्षेत्रातल्या पुढील काही प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे: रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि., द कोका-कोला सिस्टीम इन इंडिया, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (अमूल), फेअर एक्सपोर्ट्स (इंडिया) प्रा. लि. (लुलू गट), नेस्ले इंडिया लि., टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि., कार्ल्सबर्ग इंडिया प्रा. लि., बी. एल. ॲग्रो इंडस्ट्रीज लि., एबीस फूड्स अँड प्रोटीन्स प्रा. लि., एसीई इंटरनॅशनल लि., पतंजली फूड्स लि., गोदरेज ॲग्रोवेट लि., ॲग्रिस्टो मासा प्रा. लि., टिवाना न्यूट्रिशन ग्लोबल प्रा. लि., हल्दीराम स्नॅक्स फूड प्रा. लि., इंडियन पोल्ट्री अलायन्स प्रा. लि., मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि., डाबर इंडिया लि., अलाना कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि., ओलम फूड इन्ग्रेडिएंट्स, एबी इनबेव्ह, क्रेमिका फूड पार्क प्रा. लि., डेअरी क्राफ्ट, सनडेक्स बायोटेक प्रा. लि., नासो इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि ब्लूपाइन फूड्स. ही गुंतवणूक दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि पोल्ट्री, पकिटबंद अन्नपदार्थ, अल्कोहोल युक्त आणि अल्कोहोल रहित पेये, मसाले, मिठाई, खाद्यतेल, फळे आणि भाज्या, आणि खाण्यासाठी तयार असलेली उत्पादने यांसारख्या विविध विभागांमध्ये झाली आहे.

देशव्यापी स्वरूप हे या भागीदारीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही गुंतवणूक गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, आणि ईशान्येकडील प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमध्ये विभागलेली आहे. या व्यापक भौगोलिक वितरणामुळे गुंतवणुकीचे फायदे समान रीतीने विभागले जाऊन देशाच्या विविध भागांतले शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण होतील.

राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा भागीदार असलेल्या 'इन्व्हेस्ट इंडिया'ने हे सामंजस्य करार करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला साहाय्य केले. 'वर्ल्ड फूड इंडिया 2025' ने केवळ विक्रमी गुंतवणुकीची बांधिलकी मिळवली नाही, तर अन्न प्रक्रियेसाठी एक विश्वासार्ह जागतिक ठिकाण म्हणून भारताचे स्थान पुन्हा एकदा बळकट केले आहे. या कार्यक्रमाने शाश्वत वाढ, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी मजबूत पायाभरणी केली आहे, त्यामुळे जागतिक अन्न प्रणालींचे भविष्य घडवण्यात भारताचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे. 'इन्व्हेस्ट इंडिया'च्या भागीदारीसह अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याची खातरजमा करण्यासाठी उद्योगातल्या भागधारकांसोबत काम करणे सुरू ठेवणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande