मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. या वेळी ती मोठ्या पडद्यावर नाही तर वेबसीरिजमधून पुनरागमन करत आहे. रोहन सिप्पी दिग्दर्शित ‘सर्च : द नैना मर्डर केस’ या वेबसीरिजचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात कोंकणा एसीपी संयुक्ता दासची दमदार भूमिका साकारताना दिसते. पोलिस ऑफीसरच्या लुकमध्ये तिचे तीक्ष्ण संवाद आणि कणखर अंदाज प्रेक्षकांची विशेष दखल घेत आहेत.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे ही मर्डर केस गूढतेने भरलेली असून, “या दलदलीत सर्व जण संशयित आहेत, येथे कोणीही निरपराध नाही” ही ओळ संपूर्ण कथानकाचा सस्पेन्स आणखी वाढवते.
कोंकणासोबतच श्रद्धा दास, वरुण ठाकुर, ध्रुव सहगल आणि शिव पंडित यांसारखे अनेक दमदार कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. त्यामुळे ही मालिका अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
सस्पेन्स, ड्रामा आणि क्राईमने परिपूर्ण अशी ही वेबसीरिज १० ऑक्टोबर २०२५ पासून जिओ हॉटस्टार वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोंकणा सेन शर्माच्या चाहत्यांसाठी आणि क्राईम थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही एक नक्की पाहावी अशी वेबसीरिज ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर