मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। 'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि सध्या 'लंपडाव' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले एका भीषण कार अपघातातून सुखरूप बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली भोसले ज्या कारने प्रवास करत होती त्या नव्या कोऱ्या मर्सिडिज बेन्झ लग्झरी कारचा अपघात झाला असून गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र, सुदैवाने अभिनेत्रीला काहीही इजा झालेली नाही.
रुपालीनं स्वतःच हा प्रसंग सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट करत तिनं “Accident झाला, वाईट दिवस” असं लिहिलं असून त्यासोबत ब्रोकन हार्टचं इमोजीही शेअर केलं आहे. तिच्या कारच्या बोनेटला डेन्ट आला असून समोरचा भागही डॅमेज झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वीच रुपालीनं ही नवी मर्सिडिज खरेदी केली होती आणि त्या आनंदाचा क्षणही तिनं चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर केला होता. परंतु दुर्दैवानं तिच्याच त्या कारचा आता अपघात झाला आहे. अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
रुपाली भोसले सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. तिचे ग्लॅमरस फोटो, वैयक्तिक आयुष्यातील क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. रुपालीनं 'मन उधाण वाऱ्याचे', 'शेजारी शेजारी पक्के शेजारी', 'वहिनीसाहेब' यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच हिंदी मालिकांमध्ये 'बडे दूर से आए है' आणि 'तेनाली रामा' मधील तिच्या कामगिरीचीही दखल घेतली गेली आहे. सुदैवाने रुपाली भोसले सुखरूप असल्याने तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule