लखनऊ, 27 सप्टेंबर (हिं.स.) : ‘आय लव्ह मोहम्मद’ वादाच्या पार्श्वभूमीवर बरेलीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बरेली पोलिसांनी शनिवारी इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा यांना अटक केली आहे. त्यांच्यासह 8 जणांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
बरेली जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, आत्तापर्यंत 10 एफआयआर नोंदवण्यात आल्या असून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मौलाना तौकीर रझा, सरफराज, मनीफुद्दीन,अज़ीम अहमद, मोहम्मद शरीफ,मोहम्मद आमिर, रिहान,मोहम्मद सरफराज यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी परिस्थिती शांततेत हाताळण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने बॅरिकेड फोडून दगडफेक केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दगड, ब्लेड, पिस्तूल, काडतुसे आणि पेट्रोलचा वास येणाऱ्या फुटलेल्या काचेच्या बाटल्या आढळून आल्या. सध्या तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक मार्गांनी आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. या हिंसाचारात एकूण 22 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून काही जखमा गोळी लागल्यामुळे झाल्या असाव्यात, अशी शंका वर्तवण्यात येत आहे. याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. एसएसपी आर्य यांनी सांगितले की, हे स्पष्ट आहे की निदर्शकांकडून गोळीबार झाला होता. त्या वेळी सुमारे 3 हजार लोक जमले होते, ज्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेलीच्या घटनेवर भाष्य करताना म्हणाले की, बरेलीत एक मौलाना विसरला होता की सत्ता कोणाकडे आहे. तो धमक्या देत होता आणि जाम लावण्याची भाषा करत होता. पण आम्ही स्पष्ट सांगितले – ना जाम होईल, ना कर्फ्यू लागेल. आम्ही असा धडा शिकवू की त्यांची पुढची पिढीही दंगा करायचं विसरेल. राज्यात २०१७ नंतर आमच्या सरकारने दंगेखोरांना निवडून शिक्षा दिली आहे आणि त्यांच्या भाषेत उत्तर दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी