लडाखच्या लेह शहरात चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम
लेह, २७ सप्टेंबर (हिं.स.) : लडाखच्या लेह शहरात चौथ्या दिवशीही संचारबंदी सुरूच होती. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केल्यानंतर पोलीस आणि निमलष्करी दलांनी गस्त आणि तपासणी अधिक तीव्र केली आहे. शुक्रवारी रात
लडाखच्या लेह शहरात चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम


लेह, २७ सप्टेंबर (हिं.स.) : लडाखच्या लेह शहरात चौथ्या दिवशीही संचारबंदी सुरूच होती. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केल्यानंतर पोलीस आणि निमलष्करी दलांनी गस्त आणि तपासणी अधिक तीव्र केली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात उपराज्यपालांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने वांगचुक यांच्या अटकेचे समर्थन केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नेपाळ चळवळ आणि अरब स्प्रिंगचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांच्या मालिकेमुळे बुधवारी हिंसाचार झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. शांततापूर्ण लेह शहरात सामान्यता पुनर्संचयित करण्यासाठी वांगचुक यांची अटक आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे.

गेल्या २४ तासांत लडाखमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. उपराज्यपाल कविंदर गुप्ता लवकरच राजभवन येथे उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि त्यानुसार संचारबंदी शिथिल करण्याचा कोणताही निर्णय घेतला जाणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, संवेदनशील भागात पोलीस आणि निमलष्करी दलांची गस्त आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या नगरसेवकासह फरार दंगलखोरांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, या संघर्षानंतर ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर कारगिल आणि केंद्रशासित प्रदेशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारे कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.

लडाखमधील माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वांगचुक राज्याची सुरक्षा, शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवत आहे. उच्चाधिकार समिती बैठकीबद्दल सरकारला स्पष्ट माहिती असूनही आणि एचपीसी आधी बैठका घेण्याचा प्रस्ताव असूनही वांगचुक यांनी गुप्त हेतूने १० सप्टेंबरपासून शहरात उपोषण सुरू ठेवले. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे, नेपाळ चळवळीचे, अरब स्प्रिंगचे संदर्भ आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंमुळे २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. संस्था, इमारती आणि वाहने जाळण्यात आली आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे दुर्दैवाने चार लोकांचा मृत्यू झाला.

राज्याचा दर्जा आणि या प्रदेशात संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा विस्तार करण्याच्या मागण्यांचा संदर्भ देत निवेदनात म्हटले आहे की, जर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षांपेक्षा वर जाऊन त्या अजेंड्यावर सरकारशी पुन्हा चर्चा सुरू केल्यानंतर उपोषण मागे घेतले असते, तर ही संपूर्ण घटना टाळता आली असती.

निवेदनात म्हटले आहे की, शांततापूर्ण लेह लडाख शहरात सामान्यता पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी, वांगचुक यांना सार्वजनिक सुव्यवस्थेला हानिकारक पद्धतीने वागण्यापासून रोखणे देखील आवश्यक आहे. त्यांच्या प्रक्षोभक भाषणे आणि व्हिडिओंमुळे, व्यापक सार्वजनिक हितासाठी त्यांना लेह जिल्ह्यात ठेवणे योग्य नव्हते. विशिष्ट माहितीच्या आधारे प्रशासनाने वांगचुक यांना एनएसए अंतर्गत ताब्यात घेण्याचा आणि राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात स्थानांतरित करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande