गुरुग्राम, 27 सप्टेंबर (हिं.स.)। हरियाणातील गुरुग्राममध्ये शनिवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघाताची घटना घडली. दिल्लीहून वेगाने येणारी काळी थार कार (क्रमांक यूपी 81 सीएस 2319) नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळली आणि उलटली. या भीषण अपघातात दोन तरुण आणि तीन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी कपिल शर्मा (28, बुलंदशहर) याला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तत्काळ मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांमध्ये रायबरेलीचे न्यायाधीश चंद्रमणी मिश्रा यांची मुलगी प्रतिष्ठा मिश्रा (25) हिचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आदित्य प्रताप सिंह (30, आग्रा), लवने (26), गौतम (31, सोनीपत) आणि दुसरी एक तरुणी सोनी हिचा यात मृत्यू झाला आहे. गौतम सध्या ग्रेटर नोएडामध्ये राहत होता. मृतांच्या हातावर क्लब बँड आढळून आल्याने ते सर्वजण अपघातापूर्वी रात्री उशिरापर्यंत पार्टी करून परतत होते, असा संशय पोलिसांना आला आहे. तथापि, ते दारूच्या नशेत होते का याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी याची अधिकृत पुष्टी नाकारली असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. हा अपघात शनिवारी पहाटे सव्वा चार वाजता झारसडा चौकाजवळ घडला. थार दिल्लीहून येत असताना राष्ट्रीय महामार्ग 48 च्या एक्झिट 9 वरून उतरताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तीव्र वेगामुळे थार डिव्हायडरवर आदळली आणि उलटली. घटनास्थळी स्थानिक वाहनचालकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक व रुग्णवाहिका तातडीने पोहोचली आणि अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे, ज्यामध्ये थार महामार्गावरून प्रचंड वेगाने जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे वाहनचालक वेगावर नियंत्रण ठेवू शकला नसावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळाला भेट देताना वाहतूक उपायुक्त डॉ. राजेश मोहन यांनी सांगितले की रस्त्यावरील टायरच्या खुणा दर्शवतात की थार अत्यंत वेगाने चालवली जात होती. पोलिस विविध अँगलने तपास करत असून रस्त्यालगतचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. दारूच्या नशेत वाहन चालवले गेले होते का हे देखील तपासले जात आहे. गुरुग्रामसारख्या औद्योगिक शहरात पहाटेच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातामुळे वाहतुकीतील वेग, नशेत गाडी चालवणे आणि रस्ते सुरक्षा याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाच तरुणांचे जीवन एका क्षणात संपवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule