वाराणसी : लघुलेखक सेवानिवृत्त, 7 महिन्यांपासून कोर्टाचे निर्णय प्रलंबित
वाराणसी, 27 सप्टेंबर (हिं.स.) : वाराणसी जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयात स्टेनोग्राफर सेवानिवृत्त झाल्यामुळे 1200 हून अधिक प्रकरणांचे निर्णय प्रलंबित आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून एकही आदेश पारित झालेला नाही. वाराणसी जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयात लघुलेख
वाराणसी ग्राहक न्यायालय फलक


वाराणसी, 27 सप्टेंबर (हिं.स.) : वाराणसी जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयात स्टेनोग्राफर सेवानिवृत्त झाल्यामुळे 1200 हून अधिक प्रकरणांचे निर्णय प्रलंबित आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून एकही आदेश पारित झालेला नाही.

वाराणसी जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयात लघुलेखकाच्या (स्टेनोग्राफर) निवृत्तीनंतर निर्णय प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पदावर नियुक्तीसाठी ग्राहक न्यायालयाकडून 4 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. वाराणसी जिल्ह्यात ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक न्यायालय कार्यरत आहे. येथे दाखल होणाऱ्या तक्रारींचा निकाल 6 महिन्यांच्या आत होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या 1200 हून अधिक फाईल्स निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. वेळेत न्याय न मिळाल्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतर न्यायालयांप्रमाणे येथे तारीख पे तारीख मिळत नाही, पण, निकाल मात्र लांबणीवर टाकण्यात आला आहे.

फोरमचे अध्यक्ष म्हणाले की, स्टेनोग्राफरच्या नियुक्तीसाठी 7 महिन्यांपासून सतत पत्रव्यवहार चालू आहे, परंतु निदेशालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. करारावर (संविदा) किंवा मानधनावर स्टेनोग्राफर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली, पण तीही ऐकण्यात आलेली नाही. त्यामुळे फोरममधील कामकाज ठप्प झाले आहे.

वाराणसीत 1988 मध्ये जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाची स्थापना करण्यात आली होती. येथे ग्राहक स्वतः उपस्थित राहून किंवा ऑनलाइन पोर्टलवरून तक्रार दाखल करू शकतात. फोरम 50 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांवर सुनावणी करू शकतो.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande