मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। तेलुगू सुपरस्टार पवन कल्याणचा बहुचर्चित 'दे कॉल हिम ओजी' हा चित्रपट नुकताच २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि शाहरुख खानच्या 'जवान', रणबीर कपूरचा 'अॅनिमल' आणि विकी कौशलच्या 'छवा' सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले. तथापि, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट झालेली दिसली.
पहिल्या दिवशी तब्बल ६३.७५ कोटी रुपये कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त १९.२५ कोटी रुपये कमावले. म्हणजेच पहिल्या दिवसाच्या कमाईच्या निम्म्याहून कमी कमाई केली. त्याआधी या चित्रपटाने केवळ प्री-सेल्समधून २१ कोटी रुपये कमावले होते. अशाप्रकारे, 'दे कॉल हिम ओजी'ने आतापर्यंत भारतात एकूण १०४ कोटी रुपये कमावले आहेत.
या चित्रपटाद्वारे बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने तेलुगू इंडस्ट्रीत जोरदार एन्ट्री घेतली आहे. खलनायकाच्या भूमिकेत त्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही मने जिंकली. पवन कल्याणसोबतचा त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचे दमदार संवाद आणि त्याचा भयंकर अवतार यामुळे त्याने प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्या मिळवल्या. चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील प्रेक्षकांचा विशेष आवडता ठरला आहे.
आता येत्या काळात 'दे कॉल हिम ओजी' बॉक्स ऑफिसवर किती प्रभाव पाडतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर