नागपुरात संघ स्वयंसेवकांची शिस्तबद्ध पथसंचलनं नागपूर, 27 सप्टेंबर (हिं.स.) : वीर सराने ओतप्रोत वाद्यांचे घोष, एका ओळीत शिस्तीने पडणारी हजारो पावले आणि राष्ट्रभक्तीने उजळलेले चेहरे अशा मंगलमय वातावरणत कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता निघालेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्वयंसेवकांची 3 पथसंचलनं नागपूरकरांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवली. दस्तुर खुद्द सरसंघचालकांनी आज, शनिवारी शहरातील व्हेरायटी चौकात या तिन्ही पथसंचलनांचे अवलोकन केले आणि अभिवादन स्वीकारले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी दसऱ्याला आपला स्थापना दिन साजरा करतो. यंदा देखील संघाचा प्रमुख कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु, डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्त मेढ रोवली होती. त्यामुळे संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा शनिवारी 27 सप्टेंबर रोजी पथसंचालन आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी नागपुरात 2 पथसंचलनं आयोजित होतात. पंरतु, यंदा शताब्दी वर्षानिमित्त 3 पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनासाठी स्वयंसेवकांच्या 3 पथकांनी वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण केले. यातील पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदानाहून निघाले. यामध्ये नागपुरातील त्रिमूर्तिनगर, धरमपेठ, गिट्टीखदान आणि सोमलवाडा भागातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच दुसरे पथसंचलन कस्तुरचंद पार्क मैदानातून निघाले. हे पथसंचलन 2.9 किलोमीटरचे होते. यामध्ये मोहितेशाखा महाल, लालगंज, बिनाकी आणि सदर भागातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. तिसरे पथसंचलन यशवंत स्टेडियममधून निघाले यात इतवारी, अजनी, अयोध्या नगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी झाले होते.
वाद्य, घोषांच्या स्वर्धुनींनी आसमंत निनादत ही पथसंचलनं सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकात पोहोचेली. याठिकाणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पथसंचलनाचे अवलोकन केले. यावेळी त्यांच्यासह महानगर संघचालक राजेश लोया देखील उपस्थित होते. नागपुरात आजवर झालेल्या संघाच्या पथसंचलनांपैकी ही सर्वात मोठी पथसंचलनं होती. या पथसंचलनात सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी सहभागी नोंदवला. विशेष म्हणजे संघाच्या संस्कारांचा आधार असलेल्या “तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहें न रहें” ठळक अक्षरात लिहीलेल्या ओळी आणि सरसंघचालकांच्या पाठिशी असलेली महात्मा गांधींचा पुतळा हे दृष्य फार बोलके ठरले.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी