मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। मल्याळम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता व निर्माता दुलकर सलमानने आपल्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘लोकाह चॅप्टर १’च्या प्रचंड यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘लोकाह चॅप्टर २’ची घोषणा केली आहे. पहिल्या भागाने मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रचंड धूम उडवली होती आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवला होता. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने दिग्गज अभिनेता मोहनलाल यांच्या अनेक चित्रपटांना टक्कर दिली होती. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला ओळखून दुलकर सलमानने दुसरा अध्याय आणण्याचा निर्णय घेतला आहे.
‘लोकाह चॅप्टर १’चे निर्मिती कार्यदेखील दुलकरनेच केले होते. त्या चित्रपटाच्या अपार यशानंतर त्याने सिक्वेल संदर्भात मोठे अपडेट्स दिले आहेत. निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करताच याचे पहिले पोस्टर आणि झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले आहे. यावेळीही दुलकर मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्या सोबत टोविनो थॉमस आपली अभिनयाची जादू दाखवणार आहे.
चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. दुलकरने पोस्टर शेअर करताना लिहिले आहे – “मिथकांच्या पलीकडे, दंतकथांच्या पलीकडे... एक नवा अध्याय सुरू. ‘लोकाह चॅप्टर २’.”
दुसऱ्या चित्रपटाच्या पहिल्या झलकित टोविनो आणि दुलकर अंधाऱ्या जागेत बसून संवाद साधताना दिसतात. या दृश्यातून त्यांच्या व्यक्तिरेखांची रहस्यमय आणि थरारक दुनिया प्रेक्षकांसमोर उभी राहते. टोविनो चित्रपटात मायकेलची भूमिका साकारणार आहे, तर दुलकर सलमान चार्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.
या घोषणेनंतर चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘लोकाह चॅप्टर २’कडून अपेक्षा आहे की हा चित्रपट पुन्हा एकदा मल्याळम सिनेमात नवा विक्रम प्रस्थापित करेल आणि प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर