छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे
गोरगरीब भक्तांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या दानातील १ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. संस्थानाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गेल्या काही काळात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः धाराशिव आणि कळंब परिसरात शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या आणि आपल्या घामाच्या कमाईतील ५, १०, २० किंवा १०० रुपये दानपेटीत टाकणाऱ्या सामान्य भक्तांनी एक भावनिक विनंती केली होती. या दानपेटीतील पैशाचा उपयोग संकटात सापडलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी व्हावा, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली होती.
या विनंतीला मान देत मंदिर संस्थानाने तातडीने कार्यवाही केली. आज झालेल्या बैठकीत, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबद्दल भक्तांनी आणि नुकसानग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ऐन संकटाच्या काळात देवीचा आशीर्वाद मदतीच्या रूपाने धावून आल्याची भावना व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis