रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनतर्फे येत्या ४ ऑक्टोबर रोजी पुण्यात “रात्रीच्या रागांची एक अनोखी मैफल” आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये समयनुसार रागांची रचना केली आहे. उत्तररात्र आणि पहाटेचे राग सहसा ऐकले जात नाहीत. त्यामुळे आसमंत फाउंडेशनने अशा एका गायन सभेचे आयोजन केले आहे. पुण्यात येत्या ४ ऑक्टोबर रोजी भरत नाट्यमंदिरमध्ये संध्याकाळी ६ पासून पुढे उत्तर रात्रीपर्यंतचे राग या गायन सभेत ऐकायला मिळणार आहेत, अशी माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.
नवोदित गायक/गायिका या गायन सभेत आपली कला सादर करणार आहेत. शास्त्रीय गायन वादन क्षेत्रातील दिग्गज मंडळी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कलाकारांमध्ये गायक नागेश अडगावकर, आदित्य मोडक, केदार केळकर, मेहेर परळीकर, आदित्य खांडवे, रागेश्री वैरागकर, मीनल दातार, धनश्री घैसास, अंकिता जोशी आणि ज्येष्ठ गायिका पौर्णिमा धुमाळे गायन सादर करतील. तसेच पं. संगीत मिश्रा आणि अनुप कुलथे याचे अनुक्रमे सारंगी आणि व्हायोलिन वादन होणार आहे. तबलासाथ रामकृष्ण करंबेळकर, अभिजित बारटक्के आणि ऋषिकेश जगताप करतील. संवादिनीसाथ हर्षल काटदरे, नीलय साळवी आणि सुधांशू घारपुरे यांची असेल.
निखळ, स्वच्छ, निर्मल भारतीय शास्त्रीय संगीत ऐकणे म्हणजे एक प्रकारे परमेश्वराचे ध्यान केल्यासारखेच आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम श्री चरणीच आहे. श्री शंकराच्या चरणी धृपद गायनाचा उगम झाला, अशी आख्यायिका आहे. आसमंत फाउंडेशनने शास्त्रीय गायनाचा प्रचार प्रसारचे काम हाती घेताना असाच विचार केला आहे.
सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि उत्तर रात्र या समयानुसार राग ऐकल्यास एक विशिष्ट अनुभूती अनुभवायला मिळते. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रात्री नंतर विशेषत: उत्तर रात्र आणि पहाटे गायले जाणारे राग हे सर्वांत प्रभावी मानले जातात. हे राग सहसा मानवी मनाचा कल आणि भावनांशी संबंधित असतात आणि त्यांच्या नियुक्त वेळी ऐकल्यावर त्यांचा विशिष्ट प्रभाव पडतो असे मानले जाते. त्यामुळेच या विशेष मैफलीचे आयोजन केले आहे.
ही मैफल सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य असणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमास प्रवेश दिला जाईल. पहिल्या तीन रांगा गायन क्षेत्रातील मान्यवर आणि विशेष मान्यवरांसाठी राखीव असतील. नाट्यगृहावर स्वखर्चाने चहा इत्यादीची व्यवस्था असणार आहे. रात्रीच्या रागांचा हा कार्यक्रम रात्रभर सुरू असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी