नवी दिल्ली , 28 सप्टेंबर (हिं.स.)।दिल्लीतील १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा आरोपी असलेला स्वामी चैतन्यनंद सरस्वती याला आग्रा येथून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला आग्रा येथील ताजगंज भागातील एका हॉटेलमधून मध्यरात्री सुमारे ३ वाजून ३० मिनिटांनी ताब्यात घेतले. अटकेनंतर दिल्ली पोलिस त्याला आग्रहून दिल्लीला घेऊन येत आहेत.
चैतन्यनंद बराच काळ फरार होता. त्याच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी विविध पथकं तयार केली होती, जी दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये छापे टाकत होती.अखेर, पोलिसांना बाबाला आग्र्यातुन ताब्यात घेतले. शुक्रवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने चैतन्यनंदची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली होती, त्यामुळे त्याच्यावर अटकेचे सावट अधिक गडद झाले होते. त्याच दरम्यान, पोलिसांनी चैतन्यनंद विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. चैतन्यनंदची शेवटची लोकेशन आग्रामध्ये सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला तिथूनच अटक केली. यामुळे बाबा बऱ्याच काळापासून आग्र्यामध्ये लपून बसला असल्याच सांगितलं जात आहे.
हा संपूर्ण प्रकरण दिल्लीच्या वसंत कुंज भागातील ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’ या प्रबंधन संस्थेशी संबंधित आहे. स्वामी चैतन्यनंद उर्फ स्वामी पार्सारथी याच्यावर आरोप आहे की त्याने २०१० पासून आजपर्यंत मूळ ट्रस्टच्या समांतर एक बनावट ट्रस्ट तयार करून, संस्थेची कोट्यवधींची जमीन आणि निधी हडपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २० कोटी रुपयांचा निधी नवीन ट्रस्टमध्ये हस्तांतरित केला, जे मूळ ट्रस्टसाठी राखीव होते.जुलै २०२५ पासून तब्बल ६० लाख रुपये रोख स्वरूपातही काढण्यात आले. यामुळे संस्थेच्या जमिनीवर अवैध ताबा आणि आर्थिक गैरव्यवहारचा गुन्हा उघड झाला.
१९ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यनंदविरोधात ३ एफआयआर नोंदवल्या, ज्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या
कलम ४२० (फसवणूक),कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासघात) आणि इतर संबंधित गंभीर कलमांचा समावेश आहे. हे प्रकरण फक्त आर्थिक घोटाळ्यापुरते मर्यादित नाही. चैतन्यनंदवर संस्थेमध्ये शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे आरोपही झाले आहेत. या विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील होत्या आणि त्या स्कॉलरशिपवर डिप्लोमा कोर्स करत होत्या. पिडीत विद्यार्थिनींचा आरोप आहे की, स्वामीने त्यांना आश्रमात बोलावून अश्लील छेडछाड केली आणि त्यांना धमकावले.
चैतन्यनंदची अटक झाल्यानंतर, दिल्ली पोलिस आता विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण, बनावट ट्रस्ट तयार करून निधी आणि जमिनीवर कब्जा या सर्व गंभीर आरोपांबाबत त्याची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode