नागपूर, 28 सप्टेंबर 2025 (हिं.स.) : संघ म्हणजे देशाची सरगम असे पूर्वी प्रतिपादन करणारे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी रविवारी नागपुरात झालेल्या संघ गीत कार्यक्रमात आपल्या गायनातून हे विधान प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी सादर केलेल्या गीतांमधून संघ गीतातील भावभावना नेमकेपणाने पोहोचवल्या, अशी मुक्तकंठ स्तुती सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली.नागपूरच्या स्व. सुरेश भट सभागृहात झालेल्या संघ गीतांच्या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. भागवत म्हणाले की, संघ गीते गाणे हे केवळ संगीत सादरीकरण नव्हे, तर ती एक तपस्याच आहे. या गीतांतील शब्दांमागे स्वयंसेवकांचे जीवन, त्यांचे समर्पण आणि तन्मयता दडलेली असते. शंकर महादेवन यांनी तीच आत्मीयता आपल्या गायनातून साकारली. त्यांनी केवळ गायक म्हणून नव्हे, तर स्वयंसेवकाच्या भावनेतून गीते सादर केलीत असे सरसंघचालक म्हणाले. संघाकडे भारतातील विविध भाषांमधील सुमारे 25 हजारांहून अधिक गीते असल्याची माहिती देताना डॉ. भागवत यांनी सांगितले की, शब्द आणि संगीत हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नाही, तर भावनेचे खरे वहन करणारे घटक आहेत. उत्तम शब्द जेव्हा हृदयाला भिडतात आणि संगीताची साथ लाभते, तेव्हा त्यांचे प्रभाव अनेक पटींनी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघ गीतांच्या या कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी ‘बलसागर भारत होवो’, ‘हम करे राष्ट्र आराधन’, ‘सूरसंगम, तालसंगम...’, ‘विश्व में गुंजे हमारी भारती’ यांसारखी अनेक संघ गीते सादर केली. त्यांच्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समयोचित, विषयानुरूप भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी असलेल्या अभिनेता शरद केळकर यांनी भारदस्त निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमात सुसूत्रता आणि भावनात्मक उंची आणली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी