मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असताना, काइनेटिक ग्रीनने आपली बहुप्रतिक्षित ‘ई-लुना प्राइम’ ई-मोपेड लॉन्च केली आहे. ही नवी मोपेड कंपनीने ८२,४९० (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध करून दिली असून शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांच्या बदलत्या गरजा आणि वैयक्तिक गतिशीलतेचा विचार करून खास डिझाइन करण्यात आली आहे.
‘ई-लुना प्राइम’ मोपेडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची दमदार रेंज. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही मोपेड दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे. एका चार्जवर ती ११० किलोमीटरपर्यंतची रेंज देते, तर उच्च क्षमतेच्या बॅटरीच्या पर्यायासह कमाल १४० किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्यामुळे दररोजच्या प्रवासासाठी ही मोपेड ग्राहकांना अधिक सोयीची ठरणार आहे.
डिझाइनच्या बाबतीतही कंपनीने ग्राहकांच्या आवडीनुसार आकर्षक बदल केले आहेत. ‘ई-लुना प्राइम’ ही सहा विविध रंगांच्या पर्यायांत बाजारात उपलब्ध आहे. या रंगांच्या जोडीला आधुनिक ग्राफिक्स आणि बॉडी डिकेल्समुळे मोपेडला एक वेगळा लुक मिळतो.
या इलेक्ट्रिक मोपेडमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त फीचर्सचा उत्तम संगम करण्यात आला आहे. यामध्ये एलईडी हेडलाइट, प्रवाशाला सर्व माहिती स्पष्ट दिसावी यासाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सोयीस्कर प्रवासासाठी सिंगल सीट, आकर्षक रिम टेप्स, स्टायलिश बॉडी डिकेल्स, तसेच सुरक्षिततेसाठी पंचर-प्रतिरोधक ट्यूबलेस टायर्स अशा सुविधांचा समावेश आहे.
कंपनीला विश्वास आहे की, कमी देखभाल खर्च, स्वस्त दरात चार्जिंग सुविधा आणि उत्तम रेंज यामुळे ‘ई-लुना प्राइम’ शहरी आणि ग्रामीण दोन्ही बाजारपेठेत लोकप्रिय ठरणार आहे. परवडणारी किंमत आणि आकर्षक फीचर्समुळे ही मोपेड इलेक्ट्रिक दुचाकी विभागात काइनेटिक ग्रीनसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule