वॉशिंग्टन, 28 सप्टेंबर (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी(दि.२७) संयुक्त राष्ट्र महासभेच्या (युएनजीए) 80व्या सत्रात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पाकिस्तानला ‘जागतिक दहशतवादाचे केंद्र’ असे संबोधले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचाच हात असल्याचा आरोप केला.
जयशंकर म्हणाले, “भारताला स्वातंत्र्यानंतरपासूनच दहशतवादी आव्हानाचा सामना करावा लागला आहे, कारण त्याचा शेजारी देश जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे. अनेक दशकांपासून जे जे मोठे आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ले झाले, त्यांची मूळ एकाच देशाशी जोडलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीत अशा अनेक व्यक्तींची नावे आहेत, जे त्या देशाचे नागरिक आहेत.”
जयशंकर यांनी एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि त्याला सीमापार दहशतवादी अमानुषतेचे ताजे उदाहरण म्हणून मांडले. “भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलली आणि या हल्ल्याचे आयोजक व दोषींना न्यायासमोर उभे केले.”
जयशंकर म्हणाले, “आमच्यासाठी दहशतवादाशी लढा देणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, कारण तो धर्मांधता, हिंसा, असहिष्णुता आणि भीती यांचं मिश्रण आहे.
म्हणूनच, आमच्या अधिकारांचे संरक्षण करताना अशा धोरणांचा कठोरपणे सामना करणं गरजेचं आहे.”
जयशंकर यांनी जागतिक समुदायाला उद्देशून सांगितले, “दहशतवाद हे एक सामूहिक संकट आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत होणे आवश्यक आहे.
ज्या देशांनी दहशतवादाला आपली अधिकृत राज्यधोरण बनवले आहे, जिथे दहशतवादी तळ उघडपणे चालतात, आणि जिथे दहशतवाद्यांचे महिमामंडन केले जाते, अशा देशांची तीव्र शब्दांत आणि कृतीतून निंदा केली पाहिजे. दहशतवादाला आर्थिक आधार देणाऱ्यांना रोखले पाहिजे आणि प्रमुख दहशतवाद्यांवर बंदी घातली पाहिजे.”
जयशंकर यांनी इशारा दिला, “दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर सातत्याने दबाव ठेवला गेला पाहिजे.जे देश अशा प्रायोजकांचा बचाव करतात, त्यांनाही एक दिवस त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीने सुधारणा होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “परिषदेत स्थायी आणि अस्थायी सदस्यत्वाचा विस्तार करणे आवश्यक आहे. जेणेकरून ही परिषद खऱ्या अर्थाने प्रतिनिधिक होईल. भारत अशा सुधारणांनंतर मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode