काँग्रेस अधिवेशनातील गणवेशाची कल्पना बनली संघाची ओळख
नागपूर, 28 सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांचा गणवेश ही संघाची एक ठळक ओळख मानली जाते. जरी सध्याचा तपकिरी फुलपँट असलेला गणवेश 2016 पासून लागू झाला असला, तरी संघाच्या या गणवेशाची बीजे संघ स्थापनेच्या पाच वर्षांपूर्वीच, म्हणजेच 1920 सालीच रोवली गेली होती.
गणवेश हा अनुशासन आणि समानतेचे प्रतिक असतो. त्यामुळेच शाळेपासून सैन्यापर्यंत सर्वत्र शिस्त आणि समानता अधोरेखित करण्यासाठी गणवेश परिधान करतात. स्वातंत्र्यापूर्वी जाती, पंथ, धर्म, आर्थिक आणि समाजिक भेदभावांना तिलांजली देऊन सर्व समान आहेत हे ठळकपणे प्रतिपादित करण्यासाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाच्या स्वयंसेवकांसाठी गणवेश निश्चित केला होता. विशेष म्हणजे त्यांना ही गणवेशाची कल्पना संघ स्थापनेच्या 5 वर्षे आधी म्हणजे 1920 साली काँग्रेसच्या अधिवेशनात सुचली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालिन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी डॉ. हेडगेवारांच्या चरित्राचे लेखन केले आहे. शेषाद्री यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वी जानेवारी 1920 मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते एल.व्ही. परांजपे यांनी ‘भारत स्वयंसेवक मंडळ’ या संघटनेची स्थापना केली होती. डॉ. हेडगेवार हे देखील एल.व्ही. परांजपेंचे प्रमुख सहकारी होते. नागपुरात आयोजित काँग्रेसच्या वर्षीक बैठकीत सहभागी होण्यासाठी भारत स्वयंसेवक मंडळाचे सुमारे 1200 स्वयंसेवक नेमण्याचे ठरले होते. काँग्रेस अधिवेशनात मंडलाचे सदस्य वेगळे ओळखता यावे म्हणून त्यांच्यासाठी खाकी रंगाचा शर्ट, हाफ पॅन्ट, टोपी, लांब मोजे आणि बूट असा पोशाख निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यावेळी भारत स्वयंसेवक मंडळाचा गणवेश स्वीकारला होता.
संघाच्या स्थापनेनंतर 5 वर्षांनी 1930 मध्ये गणवेशात पहिला बदल टोपीचा करण्यात आला. खाकी टोपीची जाता गाळ्या टोपीने घेतली. या बदलानंतर 1939 मध्ये संघाने खाकी शर्टाऐवजी पाढरा शर्ट स्वीकारला. ब्रिटिश सैन्याने आरएसएसच्या गणवेश आणि कवायतीवर लादलेल्या निर्बंधांमुळे हे बदल घडले होते. नंतर, शूजपासून बेल्टपर्यंत सर्व गोष्टींमध्येही बदल करण्यात आले. हळूहळू, आरएसएसमधून खाकी रंग मोठ्या प्रमाणात नाहीसा झाला. परंतु, संघाच्या गणवेशात हाफपॅन्ट 2016 पर्यंत कायम होती. त्यावेळी कालौघातील बदल म्हणून संघाच्या गणवेशात खाकी हाफपॅन्ट ऐवजी तपकिरी रंगाच्या फुलपॅन्टचा समावेश करण्यात आला. राजस्थानच्या नागौर येथे आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या 3 दिवसीय बैठकीत या बदलावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गणवेश ही केवळ एक ड्रेस कोड नसून, तो संघाच्या विचारसरणीचा आणि कार्यपद्धतीचा भाग आहे. अनुशासन, समानता आणि एकरूपता हे मूल्य अधोरेखित करणारा गणवेश आजही लाखो स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. संघाच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ झाला असताना हा गणवेश केवळ बदललेल्या स्वरूपात नाही, तर एका शतकाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवासाचे प्रतीक ठरतो आहे.
गणवेशातील तीन महत्त्वाचे बदल
1930: खाकी टोपीची जागा गाळ्या टोपीने घेतली.
1939: खाकी शर्टच्या जागी पांढरा शर्ट वापरण्यात आला.
2016: खाकी हाफपँटच्या जागी तपकिरी फुलपँट लागू झाली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी