छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। कलावंतांकडून बोलताना थोडासा शब्द जरी इकडे तिकडे झाला तर ट्रोल केले जाते. एका अर्थाने कलावंत हे सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना अधिक काळजी घ्यायला हवी, असे अभिनेत्री वनिता खरात म्हणाल्या.चार जिल्ह्यातून विजेते ठरलेल्या शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत केंद्रीय युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले तेव्हा ती बोलत होती. तीन दिवस विद्यापीठ परिसरात हा जल्लोष सुरू राहणार आहे.
विद्यापीठ परिसरात २९ सप्टेंबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. महोत्सवात चार जिल्हयातून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे उद्घाटन ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते विद्यापीठ नाटयगृहात करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी विभागाचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्यांची ही प्रमुख उपस्थिती मंचावर होती.
नाटकातला नटांना देखील माहित नसलेला , कसल्याही सोयीसुविधा नसतानाही आणि पदवीला कॉप्या करून पास झालेल्या माझ्यासारखा खेड्यातला मुलगा जर दिग्दर्शक होऊ शकतो. तुम्हाला तर सगळं सोयीसुविधा रंगमंच, युवक महोत्सव यासारखी व्यासपीठ उपलब्ध असताना तुमच्या प्रतिभेळ का बहर येणार नाही, असा प्रश्न दिग्दर्शक तथा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी रावबा गजमल यांनी केला. संघर्ष हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पूजलेला असून पदोपदी होणारा अपमान हीच आपल्या सन्मानाची पायाभरणी असते, अशी समजून नाउमेद न होता कामाला लागा. प्रामाणिकपणाने स्वतःला शोधत जा...सापडत जाईल, असेही ते म्हणाले. डॉ शशिकांत बरहानपुरकर व नाट्यशास्त्री विभागबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कलावंतांना प्रोत्साहन व कलेला मोठा निधी देणारे कुलगुरू आपल्याला लाभले. सुंदरता दिसण्यावर अवलंबून असते असे नव्हे तर तुमच्या विचारातून, अभिनयातून आपण ती प्रकट करू शकता. त्यामुळे युवा कलावंतांनी अधिक प्रामाणिक व कष्ट करून स्वतःला सादर करावे असे आवाहनही त्यांनी केले.
चार जिल्ह्यात युवक महोत्सवातील विजेती प्रत्येकी बारा संघ आणि अंतिम विजेती तीन, असे प्रत्येक कला प्रकारात १५ संघाने पारितोषिक मिळणार आहे. महोत्सवाच्या विकेंद्रीकरणामुळे अपॉर्च्युनिटी पर्सेंटाइल वाढल्याचे कुलगुरूडॉ .विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. जिल्हास्त्री विजेते सर्वच संघ अंतिम विजेत्या दर्जाचे आहेत त्यामुळे केंद्रीय महोत्सवात सहभाग हाच आपला सन्मान आहे. पुढील महोत्सवाला मुख्य नाट्यगृह व आणखी दोन सुसज्ज रंगमंच तयार असतील, असेही ते म्हणाले.
मराठवाड्याच्या मातीशी घट्ट नातं सांगणाऱ्या विद्यार्थी कलावंतांच्या सांस्कृतिक विचारांची पेरणी म्हणजेच हा युवक महोत्सव आहे, असे संचालक डॉ. कैलास अंभुरे म्हणाले. विद्यापीठाने युवक महोत्सवाचे विकेंद्रीकरण केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग वाढला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याच्या नावाच्या विद्यापीठ गेटपासून सुरु होणारा हा प्रवास बुद्ध लेणी जवळ तथागताच्या पायथ्याशी थांबतो, याचा बोध घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलागुणांचा शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले .
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis