काठमांडू, 29 सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळमधील लुम्बिनी प्रांतात सोमवारी (दि.२९) एक मिनीबस अनियंत्रित होऊन उतारावरून खाली कोसळल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, हा अपघात लुम्बिनी प्रांतातील अर्घाखांची जिल्ह्यातील एका वळणावर झाला. अपघाताच्या वेळी मिनीबस बुटवलहून पुरकोटदाहा कडे जात होती. यादरम्यान बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. यामध्ये १० वर्षांचा एक आणि १३ वर्षांची एक बालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर इतर २० जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
जिल्हा पोलीस कार्यालयाचे माहिती अधिकारी झलक प्रसाद शर्मा यांच्या माहितीनुसार, मिनीबसमध्ये एकूण २६ प्रवासी होते, तर बसमध्ये केवळ १६ आसनांची क्षमता होती. शर्मा यांच्या मते, ही दुर्घटना ब्रेक फेल होणे आणि क्षमतेपेक्षा अधिक लोक बसमध्ये असणे या दोन्ही कारणांमुळे घडली असावी.
दरम्यान, याच वर्षी जुलै महिन्यात नेपाळमध्ये आणखी एक भीषण रस्ते अपघात झाला होता. तो अपघात तेव्हा झाला, जेव्हा एक जीप अचानक दगडांवर आदळून सुमारे १०० मीटर खोल खाईत कोसळली होती. ही दुर्घटना नेपाळच्या सुदूर पश्चिम प्रांतात घडली होती. त्या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६ जण जखमी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode