दुबई, 29 सप्टेंबर (हिं.स.) - आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पाच विकेट्सनी दणदणीत पराभव केला. हा विजय भारतीय संघासाठी आनंदाचा क्षण असायला हवा होता. पण सामन्यानंतरचा समारंभ वादाचे केंद्र बनला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांनी भारतीय क्रिकेटपटूंना ट्रॉफी आणि पदके स्वीकारण्यापासून रोखले. भारतीय संघाने यापूर्वीच जाहीर केले होते की क्रिकेटपटू नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत.
या निर्णयाचा आदर करण्याऐवजी, नक्वी स्टेजवर उभे राहिले आणि नंतर ट्रॉफी घेऊन हॉटेलमधून निघून गेले. नक्वी यांनी निर्लज्जपणाचा कळस केला आणि ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनपर ट्विटबद्दल खोटे बोलले. इतरांना खेळ आणि राजकारणात मिसळू नका, असा सल्ला देणाऱ्या नक्वी यांनी स्वतःच या मुद्द्याचे राजकारण केल्याचे दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी एक्सव लिहीले की, मैदानावरही ऑपरेशन सिंदूर. निकाल एकच आहे: भारत जिंकला. आमच्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन. प्रत्युत्तर म्हणून नक्वी यांनी एक धक्कादायक आणि खोटे विधान केले. आहे त्यांनी एक्सवर लिहिले की, जर युद्ध हे अभिमानाचे माप असेल, तर इतिहासाने पाकिस्तानकडून तुमचा अपमानजनक पराभव आधीच नोंदवला आहे. कोणताही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही. युद्धाला खेळात ओढणे केवळ निराशा दर्शवते आणि खेळाच्या भावनेचा अपमान करते.
भारताने नक्वी यांना पाकिस्तानी प्रतिनिधी मानून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. एसीसी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांना पुरस्कार सादर करण्याची सूचना केली, पण नक्वी यांनी हे होण्यापासून रोखले. जवळजवळ एक तासाच्या तणावानंतर आयोजकांनी शांतपणे ट्रॉफी घेतली. तर तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा सारख्या वैयक्तिक क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी भारतीय संघाने पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन न करून आणि पारंपारिक ट्रॉफीसह फोटोशूटमध्ये भाग न घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. संघाने मैदानावर देखील स्पष्ट संकेत दिले होते की, त्यांना फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि राजकीय वक्तृत्वाचा भाग बनायचे नाही. पण पाकिस्तानचे गृहमंत्री नक्वी यांनी मैदानाबाहेरही हा तणाव सुरू ठेवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे