नवी दिल्ली , 29 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत नवव्यांदा हा किताब आपल्या नावे केला आहे. हा सामना दुबईमध्ये खेळला गेला आणि भारताच्या या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर वेगळ्याच अंदाजात टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.
विजयानंतर सोशल मीडियावर #ऑपरेशन सिंदूर ट्रेंड होऊ लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर लिहिलं, “Operation Sindoor on the games field. निकाल तोच – भारताचा विजय! आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा.” या संदेशांमुळे चाहत्यांचा आनंद आणखी वाढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्सवर लिहिलं , “Operation Sindoor in sports too, खेळांमध्येही ऑपरेशन सिंदूर! भारताने पाकिस्तानचा पराभव केला! टीम इंडियाला या भव्य आणि ऐतिहासिक विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये लिहलं कि, “एक अभूतपूर्व विजय. आमच्या मुलांनी उत्कट उर्जेने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना उडवून दिले. भारत कोणत्याही क्षेत्रात असला तरी जिंकणारच आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा देताना त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहलं कि, “संपूर्ण आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध निर्णायक विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. तुमच्या सातत्य, शिस्त आणि टीमवर्कने संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.”
भारताला 147 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, पण सुरुवातीला संघ अडखळला. केवळ 20 धावांवर अभिषेक शर्मा (5), शुभमन गिल (12) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (1) माघारी परतले. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरला. तिलक वर्माने 53 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावा केल्या, तर सॅमसनने 21 चेंडूंवर 24 धावा करत चौथ्या विकेटसाठी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode