इस्लामाबाद , 29 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) मध्ये पाक सरकारविरुद्ध लोकांचा रोष प्रचंड प्रमाणात उफाळून बाहेर आला आहे. पीओकेमध्ये महागाईने लोक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे संतप्त जनता आता सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. पीओकेमध्ये सध्या अवामी अॅक्शन कमिटी (एएसी) च्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाकिस्तानी सरकारने सुरक्षा दल तैनात केले आहे.
एएसीच्या नेतृत्वाखाली पीओकेमध्ये सरकारविरोधी आंदोलन सुरु झालं आहे. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, आज सोमवारी पीओकेमध्ये पूर्ण बंद ची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे.हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामुळे सामान्य जनजीवन ठप्प झालं आहे. दुकानं,रस्ते, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुजफ्फराबादपासून कोटलीपर्यंत, अवामी अॅक्शन कमिटीच्या आवाहनावरून मोठ्या संख्येने लोक सरकारविरोधी निदर्शनात सहभागी होत आहेत. आंदोलनकर्ते “ न्याय आणि अधिकार” यांचे नारे देत आहेत.
अवामी अॅक्शन कमिटी हे एक नागरी संघटना आहे, जे अलिकडच्या काही महिन्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं आहे. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत.या संघटनेने 38 सूत्री मागण्यांचा चार्टर जाहीर केला आहे. त्यामध्ये, पीओके विधानसभा मध्ये असलेल्या काश्मीरी निर्वासितांसाठी राखीव 12 जागा रद्द कराव्यात, अन्नधान्यांवर सबसिडी मिळावी, मंगला जलविद्युत प्रकल्पामधून योग्य दरात वीज मिळावी आणि इस्लामाबादने दिलेली जुनी आश्वासने प्रत्यक्षात उतरवावीत अश्या काही प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
मुजफ्फराबादमध्ये लोकांना संबोधित करताना, अवामी अॅक्शन कमिटीचे नेते शौकत नवाज मीर म्हणाले, “आमचं आंदोलन कोणत्याही संस्थेविरोधात नाही, तर आमच्या मौलिक हक्कांसाठी आहे. गेल्या 70 वर्षांपासून आमच्या लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे. आता मात्र पुरे झालं. आमचे अधिकार द्या, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जा. आमचा संघर्ष 1947 पासून आम्हाला नाकारण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांसाठी आहे.पाकिस्तान सरकार पीओकेकडे वसाहतवादसारखं पाहते, एकसमान अधिकार असलेल्या भागासारखं नाही.”
पीओके मधील आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. हे पाहता पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारने या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावले आहे. हजारो लष्करी जवान रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. हे आंदोलन रविवार रात्रीपासूनच उग्र रूप धारण करत आहे, त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून सरकारने इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे. काही भागांत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले आहेत. इस्लामाबादहून अतिरिक्त फोर्स बोलावण्यात आली आहे. मुजफ्फराबादसारख्या शहरांमध्ये प्रवेश व निर्गमनाच्या मार्गांवर अडथळे लावण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode