मुंबई, २९ सप्टेंबर (हिं.स.) : महापालिका निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा लढवण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचे नाही. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवणे, हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजले आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईतील शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी झालेल्या संवादाबाबत पत्रकारांना माहिती दिली.
सध्या पक्षाकडून लोकसभानिहाय बैठका सुरू आहेत. शाखाप्रमुख हा परिसरातील प्रत्येक नागरिकांशी सातत्याने संपर्कात असतो. स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो कायम अग्रेसर असतो. याच कारणामुळे तो शिवसेनेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. शाखाप्रमुखांना निवडणुकीत काय काम करायचे हे सांगणे हे काय नवीन नाही. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे पक्षाचे सर्व शाखाप्रमुख आता ऍक्टिव्ह झाले आहेत. ते फक्त निवडणुकांची वाट पाहत आहेत. निवडणुका कधीही येऊ देत मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकवण्यासाठी सारे सज्ज झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असतो. तोच निवडणुकीत उमेदवाराला जिंकून आणण्याचे काम करतो. जागा वाटपाबाबत लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये महायुतीचे समन्वयक चर्चा करतील. ज्या जागा जिंकण्याची खात्री आहे त्याच लढवाव्यात तरच महायुतीवर महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकेल, अशी सूचना केल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. केवळ संख्येसाठी जागा अडवणे योग्य होणार नाही. इलेक्टिव्ह मेरिट पाहिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
युतीमध्ये जागावाटपामध्ये योग्य तो मानसन्मान राखला जाईल. किती जागा लढवणार हे महत्त्वाचे नसून महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेसाठी विविध विकास प्रकल्प राबवले आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कारकिर्दीमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत.
केलेल्या विकास कामांच्या जोरावरच महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने संख्याबळ मिळाले आहे. ही केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत आणि याच विकासकामांच्या जोरावर जनता आम्हाला निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काम करणाऱ्यांना मुंबईकरांनी पसंती दिली आहे. विरोधकांची निवडणुकीमध्ये हार होते तेव्हा ते ईव्हीएम, न्यायालय, निवडणूक आयोग यांच्यावर ते आक्षेप घेतात, अशी टीकाही त्यांनी केली.
आमचे सरकार जाणार, मुख्यमंत्री निवडणुकीत पडणार, असे विरोधक सातत्याने बोलत होते. त्यांना योग्य ज्योतिषी मिळाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले आहे. याचा विसर विरोधकांना पडला आहे. त्यांना त्यांच्या भ्रमात राहू दे आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी