नवी दिल्ली, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भविष्यातील अणु आणि जैविक धोक्यांपासून देशाच्या सुरक्षेसाठी आपण सज्ज असले पाहिजे असे सुतोवाच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केले. नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे लष्करी परिचारिका सेवेच्या शतकी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सीडीएस जनरल चौहान म्हणाले की, आजच्या डेटा-केंद्रित युद्धाच्या युगात, जिथे माहितीवर अधिकार मिळवणे शत्रूला वरचढ ठरवू शकते, तिथे वैद्यकीय डेटाची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय डीएनए हा अत्यंत खास आहे. आपल्या प्रतिकारशक्तीची प्रतिक्रिया विविध वातावरणात किंवा संसर्गांप्रती वेगळी असते. त्यामुळे व्यक्तिगत वैद्यकीय माहितीचे संरक्षणही देखील महत्त्वाचे ठरते. यात रुग्णाची वैद्यकीय केस हिस्टरी, चाचणी अहवाल, आरोग्य नोंदी यांचा समावेश होतो. तसेच तैनाती, आरोग्यविषयक नमुने, आणि आपत्कालीन स्थलांतराच्या योजना यांसंबंधीचा डेटा लीक होऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जरी वैद्यकीय डेटा संरक्षण ही थेट लष्करी परिचारिका सेवेची जबाबदारी नसली, तरी अशा प्रकारच्या धोका-आधारित आव्हानांची जाणीव असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या परिचारिकांच्या प्रशिक्षणामध्ये भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा विचार करणे आवश्यक आहे. कोरोना साथरोगाच्या काळात संपूर्ण जग अत्यंत कठीण टप्प्यातून गेले. भविष्यात मानवनिर्मित, अपघाती किंवा नैसर्गिक जैविक धोके वाढण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितींमध्ये प्रतिबंध आणि उपचारांसाठी वेगळ्या उपचार प्रोटोकॉल्सची आवश्यकता असते. आपल्याला त्या दृष्टीने सज्ज राहावे लागेल असे चौहान यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘भारत कोणत्याही अण्वस्त्र धमक्यांना घाबरणार नाही. यापार्श्वभूमीवर जनरल चौहान म्हणाले की, अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता अतिशय कमी असली तरी, आपण त्याविरोधात उपाययोजना करणे हीच शहाणपणाची गोष्ट आहे. रेडियोलॉजिकल धोके टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि प्रोटोकॉल्स आवश्यक असतात आणि ते आपल्या प्रशिक्षणाचा भाग व्हायला हवेत. अणु धोक्यांपासून बचावासाठी सज्जता महत्त्वाची असून, ती बचावामध्ये मोलाची ठरते असे त्यांनी सांगितले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी