अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : डिगरगव्हाण येथे पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या तलावात फेकण्याची घटना घडून दहा दिवस उलटून गेले, मात्र अजूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी गावात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतच्या वतीने तलावाची साफसफाई करण्यात आली मात्र आरोग्य विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी पोल्ट्री फार्म मालक पांडुरंग माणिकराव कडू यांनी अज्ञात आजाराने मृत झालेल्या शेकडो कोंबड्या गावातील तलावात फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे तलावाचे पाणी गंभीरपणे दूषित झाले. हेच पाणी गावकऱ्यांच्या दैनंदिन वापरासाठी असल्याने संपूर्ण गाव आरोग्याच्या भीषण संकटाच्या छायेत आले आहे. तलावातून दुर्गंधी पसरू लागली असून परिसरात आजारांचा फैलाव होण्याचा धोका अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे घटनेला दहा दिवस उलटले तरी आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग वा प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याने ठोस हालचाल केलेली नाही. या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दरम्यान, कोंबड्यांवर आलेल्या अज्ञात आजारामुळे नागरिक चिकन खाण्यापासूनही दूर राहत आहेत. मांस विक्रेत्यांच्या दुकानांवर शुकशुकाट असून पोल्ट्री व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नागरिकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या फार्म मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आद्यपही पोल्ट्री फार्म वर कारवाई झालेली नाही किंवा फार्म मधील कोंबड्यांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली नाही.नागरिकांमध्ये आरोग्याविषयी भीतीचे सावट पसरले असून विभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी