मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। या नवरात्रीत तुला जपणार आहे या मालिकेतील मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे हिने स्वतःच्या आयुष्यात देवी महागौरीचे कोणते गुण पाहते, यावर सुंदर विचार मांडले आहेत. नवरात्र म्हणजे रंग, भक्ती, उत्साह आणि देवीच्या विविध रूपांमधून प्रकटणाऱ्या अपार शक्तीचा उत्सव. या नऊ दिवसांत प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील तेज, करुणा, धैर्य आणि निश्चयाचा सन्मान केला जातो. देवीचं प्रत्येक रूप आपल्याला सांगून जातं की स्त्री ही केवळ कोमल नसून ती अपरिमित शक्तीची मूर्ती आहे. या शक्तीपूर्ण आणि रंगीबेरंगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महिमा म्हणते, मला महागौरीशी जोडलेलं वाटतं, कारण तिच्यात शांती, संयम आणि स्थिरता आहे. ती पवित्रतेचं आणि सौम्यतेचं प्रतीक आहे. माझा स्वभावही शांत असून मी थोडी अंतर्मुख आहे. हा स्वभाव मला शूटिंगदरम्यान खूप मदत करतो. कारण एखादा सीन करताना मन शांत आणि एकाग्र असेल तर त्याचा परिणाम उत्तम होतो. जिथे मतभेद असतात, तिथे वाद होण्याआधीच मी ते सोडवण्याचा प्रयत्न करते. मी फार एकाग्र आणि स्पष्ट विचारांची आहे. मला माझ्या आयुष्यात काय हवे हे बऱ्यापैकी माहिती आहे. एक कलाकार म्हणून माझी दिनचर्या खूप व्यस्त असते आणि त्यात गोष्टी सांभाळण्यासाठी स्थिरता खूप गरजेची असते. महागौरी, संयमाचंही प्रतीक आहे. कलाकार म्हणून आपण ऑडिशन, सिलेक्शन अशा अनेक टप्प्यांतून जातो आणि त्यासाठी संयम लागतो. तसंच आयुष्यात कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे.
बघत राहा महिमाला 'तुला जपणार आहे' मालिकेत दररोज रात्री १०:३० वा सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर