‘महाकाली’मधील अक्षय खन्नाचा दमदार लूक प्रदर्शित
मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अभिनेता अक्षय खन्नाने आपल्या अलीकडच्या अभिनय प्रवासात प्रेक्षकांना अनेकदा आश्चर्यचकित केले आहे. ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबची भूमिका गाजवल्यानंतर आता तो पौराणिक कथांवर आधारित नव्या ‘महाकाली’ चित्रपटात असुर गुरु शुक्राचार्य
‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नाचा दमदार लूक प्रदर्शित


मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अभिनेता अक्षय खन्नाने आपल्या अलीकडच्या अभिनय प्रवासात प्रेक्षकांना अनेकदा आश्चर्यचकित केले आहे. ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबची भूमिका गाजवल्यानंतर आता तो पौराणिक कथांवर आधारित नव्या ‘महाकाली’ चित्रपटात असुर गुरु शुक्राचार्य या रूपात दिसणार आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी तो डोळसपणे स्वीकारला असून त्याबद्दल प्रचंड उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

अक्षयचा शुक्राचार्य अवतार अत्यंत प्रभावी भासत आहे. लांब पांढरे केस, दाट दाढी आणि गंभीर चेहरा यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेतील तीव्रता आणि सामर्थ्य ठळकपणे जाणवते. या लूकमुळे पौराणिक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, काहींनी तर या व्यक्तिरेखेला पाहून अमिताभ बच्चनच्या ‘अश्वत्थामा’लाही मागे टाकेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी याआधी ब्लॉकबस्टर हिट ‘हनुमान’ दिला होता. आता ते आपल्या खास सिनेमॅटिक दृष्टीकोनातून पौराणिक कथांना मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहेत. ‘महाकाली’ हा त्यांच्या ‘प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा भाग असणार आहे. दिग्दर्शक वर्मा यांनी चित्रपटाविषयी बोलताना म्हटले, “देवतांच्या छायेत विद्रोहाची सर्वात प्रखर ज्वाला पेटली. शाश्वत असुर गुरु शुक्राचार्य या रूपात आम्ही अक्षय खन्ना प्रेक्षकांसमोर सादर करीत आहोत.”

दरम्यान, या चित्रपटातील इतर कलाकारांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अक्षयच्या या व्यक्तिरेखेसोबत पडद्यावर कोणते कलाकार झळकतील याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘महाकाली’ चित्रपट अक्षय खन्नाच्या कारकिर्दीसाठीच नव्हे तर भारतीय पौराणिक सिनेमासाठीही एक महत्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा आहे. थरारक दृश्ये, प्रभावी लूक आणि गहन कथानकामुळे प्रेक्षकांना जुन्या पौराणिक व्यक्तिरेखांचा एक नवा दृष्टिकोन अनुभवायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande