नवी दिल्ली, 30 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या क्रिकेटपटूमनी एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ट्रॉफी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले. नक्वी यांच्या वागण्यावर जोरदार टीका झाली आहे. दरम्यान, पीसीबी प्रमुख आणि एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आता भारताला ट्रॉफी देण्यास सहमती दर्शविली आहे. पण त्यांनी एक विशिष्ट अट घातली आहे. ते म्हणतात की, पुन्हा समारंभ आयोजित केला तरच ते भारतीय संघाला ट्रॉफी देतील आणि ते वैयक्तिकरित्या संघाच्या क्रिकेटपटूंना ट्रॉफी आणि पदके देतील.
एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास तयार आहेत. पण एका अटीवर. नक्वी यांनी भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंना वैयक्तिकरित्या पदके देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना यासाठी 'औपचारिक समारंभ' आयोजित करायचा आहे. त्यांना वैयक्तिकरित्या भारतीय क्रिकेटपटूंना पदके आणि ट्रॉफी सोपवायची आहे. पण भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध पाहता अशी व्यवस्था होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
यापूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नक्वी यांच्या हॉटेलच्या खोलीत ट्रॉफी आणि पदके घेऊन जाण्याबद्दल टीका केली होती. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले होते की, आम्ही एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय घेतला नाही. जे पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. म्हणून, आम्ही त्यांच्याकडून ते स्वीकारणार नाही. त्यांनी असेही सांगितले होते की, बीसीसीआयने या प्रकरणाची तक्रार आयसीसीकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ असा नाही की, त्यांनी पदकांसह ट्रॉफी घेऊन जावे. हे खूप दुर्दैवी आणि खेळाच्या भावनेविरुद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे