शारजाह, 30 सप्टेंबर (हिं.स.)आसिफ शेख आणि संदीप जोर यांच्या शानदार अर्धशतकांनंतर मोहम्मद आदिल आलमच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर नेपाळने दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह, नेपाळ क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. टी-२० क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच नेपाळने पूर्ण सदस्य संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकली आहे.
शारजाह क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा केल्या. नेपळाने ठेवलेल्या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १७.१ षटकांत ८३ धावांवर सर्वबाद झाला. या सलग दोन पराभवांसह वेस्ट इंडिजने टी-२0मालिका गमावली.
१७४ धावांचा बचाव करताना मोहम्मद आदिल आलमने नेपाळच्या संघासाठी चांगली कामगिरी केली. आदिलने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २४ धावा देऊन ४ फलंदाजांना बाद केले. कुसल भुर्तेलनेही २.१ षटकांत १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दीपेंद्र सिंग अरी, करण केसी आणि ललित राजबंशी यांनी प्रत्येकी एकेक घेतली.
नेपाळकडून आसिफ शेख आणि संदीप जोर यांनी फलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतके झळकावली. आसिफ शेख ४७ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. संदीपनेही ३९ चेंडूंत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ६३ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात मोहम्मद आदिलने ११ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे