पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आता परदेशी लीगमध्ये खेळता येणार नाही
इस्लामाबाद, 30 सप्टेंबर, (हिं.स.) आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या क्रिकेटपटूंचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यावर बंदी घातली असल्याची चर्चा आहे. एनओसी निलंबित केल्यामुळे राष्ट्रीय क्रिके
बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी


इस्लामाबाद, 30 सप्टेंबर, (हिं.स.) आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या क्रिकेटपटूंचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यावर बंदी घातली असल्याची चर्चा आहे. एनओसी निलंबित केल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेटपटूंना आता कोणत्याही परदेशी टी२० किंवा फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी राहणार नाही.

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद समीर अहमद यांनी खेळाडूंना परदेशी लीगपेक्षा देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अव्वल क्रिकेटपटूंवर होणार आहे. यामध्ये बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, फहीम अश्रफ आणि शादाब खान यांचा समावेश आहे, जे या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणार होते. हरिस रौफ आणि इतर क्रिकेटपटूंना आयएलटी२० सारख्या फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याची परवानगी होती.

पीसीबीने एनओसी देण्यावर बंदी घालण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे की, बोर्डाचे हे पाऊल आशिया कपमधील संघाच्या खराब कामगिरीनंतरी तात्काळ प्रतिक्रिया आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या अंतिम फेरीचा सामना एक रोमांचक लढत होती. भारताने शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने पाकिस्तानी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं होतं. तर तिलक वर्माने नाबाद 69 आणि शिवम दुबेच्या 33 धावांच्या खेळींनी भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

२०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा, फहीम अश्रफ आणि हसन अलीसह सर्व क्रिकेटपटू लाहोरला परतले. आशिया कपमधील या अपमानजनक पराभवामुळे पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्यास प्रवृत्त केले.

पीसीबीचा हा निर्णय देशांतर्गत क्रिकेट आणि राष्ट्रीय संघाला प्राधान्य देण्याचे संकेत देतो. फ्रँचायझी क्रिकेट ही पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंसाठी एक मोठी संधी आहे. पण बोर्डाचा संदेश स्पष्ट आहे. देश आणि देशांतर्गत क्रिकेट प्रथम. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताकडून पराभव झाल्यावर प्रत्येक वेळी अशा बातम्या येतात. तरीही असे असूनही, पाकिस्तानी क्रिकेट रचनेत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

संघाची परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. कधी पीसीबी अध्यक्ष, कधी कर्णधार, कधी प्रशिक्षक बदलले जातात. क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवण्याऐवजी त्यांना संघातून वगळले जाते. यावेळी पाकिस्तान एकाच स्पर्धेत टीम इंडियाकडून तीन वेळा पराभूत झाला. हे पाकिस्तान क्रिकेट संघात महत्त्वपूर्ण बदल सूचित करते. पाकिस्तानी चाहत्यांनी नक्वी यांना काढून टाकण्याचीही मागणीही केली आहे. एनओसी रद्द झाल्यामुळे क्रिकेटपटू बंड करतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यापूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी बंड पुकारले होते. या निलंबनाचा विशेषतः तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंवर परिणाम होईल जे मर्यादित संधींसह त्यांची कारकीर्द पुढे नेऊ इच्छित आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande