
नाशिक, 11 जानेवारी (हिं.स.)।
:- भंडाऱ्यातील प्रसाद घरी आणण्याच्या कारणातून झालेल्या वादात लहान भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडक्याने मारल्याने मृत्यू झाल्याची घटना बोधलेनगर येथे घडली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रेखा दत्तू बोरसे (रा. सुयोगनगर, आर. टी. ओ. कॉलनीजवळ, बोधलेनगर, नाशिक) ही महिला मजुरी करते. त्या दोन भावांसह राहतात. बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की दि. ९ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ सनी दत्तू बोरसे (वय ३०) याने मोठा भाऊ योगेश ऊर्फ बाळा दत्तू बोरसे (वय ३२) याने भंडाऱ्यातील प्रसाद घरी आणल्याच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी सनी बोरसे याने योगेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला लाकडी दांडक्याने कपाळावर व पाठीवर मारून योगेशला जिवे ठार मारले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सनी बोरसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV