
कोल्हापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांची इनोव्हा कारची दुसऱ्या ट्रकला जोरात धडक बसून कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कलबुर्गी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या आई आणि कार चालक दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. तर पोलिस अधिक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दोन दिवसापूर्वी वैष्णवी पाटील कुटुंबियासह देवदर्शनासाठी कर्नाटकात गेल्या होत्या. रात्री बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
चित्रदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भालचंद्र नाईक आणि पथकाने घटनास्थळी धाव घेऊन
जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात कमल हरिभाऊ पाटील (वय ६९, रा. कांदे, जि. सांगली) आणि राकेश अर्जुन ऐवाळे (वय ३९, रा. निपाणी)यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात वैष्णवी सुरेश पाटील (वय ४५, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग),कुसुम प्रल्हाद पाटील (वय ५७, रा. कांदे, जि. सांगली) आणि उदय दत्तात्रय पाटील (वय ३८, पोलिस हवालदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)हे तिघे जखमी झाले
यांच्यावर तेथे उपचार सुरू असून पोलिस अधिक्षक वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरो वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar