
वडोदरा, 11 जानेवारी (हिं.स.)विराट कोहली, शुभमन गिल आणि हर्षित राणा यांच्या शानदार कामगिरीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करण्यात यश आले. यासह, भारतीय संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, किवीज संघाने भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे शुभमन गिलच्या संघाने एक षटक शिल्लक असताना चार विकेट्स राखून साध्य केले. विराट कोहलीने ९३ धावा केल्या, गिलने ५६ धावा केल्या आणि राणाने ४९ धावा केल्या आणि भारताच्या प्रभावी विजयात मोलाचे योगदान दिले.
३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने ९१ चेंडूत ९३ धावा, कर्णधार शुभमन गिलने ७१ चेंडूत ५६ धावा आणि श्रेयस अय्यरने ४९ धावा केल्या. एका क्षणी, सामना अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचला होता. किवी संघ पुनरागमन करत असल्याचे दिसत होते. पण मोक्याच्या क्षणी हर्षित राणाने २३ चेंडूत २९ धावा करून विजयाचा पाया रचला आणि त्यानंतर केएल राहुलने ३१ चेंडूत नाबाद २९ धावा करत विजय मिळवला.
तत्पूर्वी, डॅरिल मिशेल (८४), हेन्री निकोल्स (६२) आणि डेव्हॉन कॉनवे (५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने आठ बाद ३०० धावा केल्या. कॉनवे आणि निकोल्स यांनी ११७ धावांच्या भागीदारीसह किवी संघाला चांगली सुरुवात दिली. त्यानंतर न्यूझीलंडचा मधला क्रम डळमळीत झाला आणि यजमान संघाने नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. भारताकडून, वेगवान गोलंदाज हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने एक विकेट्स घेतल्या. एका वेळी, २२ व्या षटकात न्यूझीलंडची धावसंख्या विनाबाद ११७ होती, पण ३८ व्या षटकापर्यंत, धावसंख्या पाच बाद १९८ अशी घसरली होती.
हर्षित राणाने निकोल्सला बाद करून कॉनवेसोबतची शतकी भागीदारी मोडली. राणाने काही हळू आणि काही वेगवान चेंडू टाकून न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले, परंतु २४ व्या षटकातील शेवटचा चेंडू कॉनवेच्या बॅटच्या आतील कडाला लागून विकेटवर गेला. सिराजने विल यंगला हळू चेंडू टाकून बाद केले, तर प्रसिद्ध कृष्णाने (२/६०) ३७ व्या षटकात मिचेल हे (१२) ला बाद केले. ग्लेन फिलिप्स थोडासा आळशी दिसत होता आणि त्याला कुलदीपने बाद केले. न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेल धावबाद झाला. पदार्पण करणाऱ्या ख्रिश्चन क्लार्कने १७ चेंडूत तीन चौकारांसह नाबाद २४ धावा केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे