
बंगळुरु, 11 जानेवारी (हिं.स.)विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थानिक क्रिकेट दिग्गज मुंबई आणि कर्नाटक यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल यांच्याकडून त्यांचा प्रभावी फॉर्म कायम राहण्याची अपेक्षा असेल. तर सेंटर ऑफ एक्सलन्स येथे उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात दुसरा उपांत्यपूर्व खेळला जाणार आहे.
कर्नाटकला ग्रुप स्टेजमधील त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात फक्त एक पराभव पत्करावा लागला. तरीही, संघ मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आत्मविश्वास बाळगेल. देवदत्त पडिक्कल हा सात डावांमध्ये ६४० धावा करून स्पर्धेतील आघाडीचा फलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत चार शतके आणि एक अर्धशतक झळाकवले आहे. जर त्याने आपला फॉर्म कायम ठेवला तर २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची तयारी करणाऱ्या निवडकर्त्यांना त्याला दुर्लक्ष करणे कठीण होईल.
सरफराज खान त्याच्या स्फोटक टी-२० फॉर्मचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रूपांतर करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शेवटच्या लीग सामन्यात पंजाबविरुद्धच्या अनपेक्षित पराभवात, सरफराजने पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. मुंबईने तो सामना गमावला होता. सरफराज मर्यादित षटकांच्या स्वरूपात निवडकर्त्यांना आपला संदेश पोहोचवण्यात यशस्वी झाला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यात उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र एकमेकांसमोर येतील. या सामन्यात उत्तर प्रदेशचा वरचष्मा असेल. लीग टप्प्यात अपराजित राहिलेला चारही गटांमधील उत्तर प्रदेश हा एकमेव संघ होता. ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर भारतीय एकदिवसीय संघात सामील झालेल्या ध्रुव जुरेलच्या सेवेशिवाय उत्तर प्रदेश खेळणार आहे.
जुरेलने लीग टप्प्यात सात डावांमध्ये ५५८ धावा केल्या आणि ते पूर्णपणे अजिंक्य दिसत होते. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत पराभव झाल्यानंतर सौराष्ट्राने जोरदार पुनरागमन केले, सलग चार सामने जिंकून शेवटच्या आठमध्ये पोहोचले. त्यांचे फलंदाज योग्य वेळी फॉर्ममध्ये परतताना दिसत आहेत, तर वेगवान गोलंदाज चेतन सकारिया देखील चांगल्या लयीत दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे