
भारतावर या लीकचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता
मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.)। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामच्या तब्बल 1.75 कोटींहून अधिक वापरकर्त्यांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी मालवेअरबाईट्सच्या अहवालानुसार ही माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली असून डार्क वेबवर त्याची विक्री केली जात आहे. लीक झालेल्या या डेटामध्ये युझरनेम, घराचा पत्ता, फोन नंबर, ईमेल पत्ता अशा महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे.
कंपनीने सांगितले की त्यांच्या नियमित डार्क वेब स्कॅनदरम्यान ही गळती उघड झाली असून ही घटना 2024 मध्ये इंस्टाग्रामच्या API सुरक्षा उल्लंघनाशी संबंधित आहे. या डेटाचा वापर करून गुन्हेगार फिशिंग, अकाउंट हॅकिंग आणि क्रेडेंशियल स्टफिंगसारखे गंभीर सायबर हल्ले करू शकतात.
भारतावर या लीकचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता
भारतावर या लीकचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार ऑक्टोबर 2025 पर्यंत भारतात इंस्टाग्रामचे 48 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. त्यामुळे लीक झालेल्या डेटामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वापरकर्त्यांची माहिती असण्याची शक्यता आणि त्यातून निर्माण होणारा धोका अधिक गंभीर मानला जात आहे. मालवेअरबाईट्सने इशारा देत सांगितले की हॅकर्स या माहितीचा वापर करून वापरकर्त्यांना बनावट ईमेल, मेसेज पाठवून फसवू शकतात, त्यांची सोशल मीडिया खाती ताब्यात घेऊ शकतात तसेच ज्या प्लॅटफॉर्मवर तोच पासवर्ड वापरला जात आहे, तिथेही घुसखोरी करू शकतात.
वापरकर्त्यांनी आपले अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी तत्काळ सुरक्षा तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंस्टाग्रामच्या सेटिंग्जमधील ‘Where you’re logged in’ पर्याय तपासून अनोळखी डिव्हाइस असल्यास ते त्वरित काढून टाकणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवणे आणि पासवर्ड वेळोवेळी बदलणे हे उपाय सुचवण्यात आले आहेत. दरम्यान, मेटाने मात्र डेटा ब्रीचचे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, केवळ एक तांत्रिक समस्या दुरुस्त करण्यात आली असून कोणताही डेटा ब्रीच झालेला नाही आणि वापरकर्त्यांची खाती सुरक्षित असल्याचा दावा मेटाने केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule