जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओच्या तयारीत; इतिहासातील सर्वात मोठ्या इश्यूची शक्यता
मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.)। रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी त्यांच्या दूरसंचार व डिजिटल सेवांच्या कंपनी ‘रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स’ला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत असून या वर्षीच आयपीओ येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या
Jio  IPO


मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.)। रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी त्यांच्या दूरसंचार व डिजिटल सेवांच्या कंपनी ‘रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स’ला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत असून या वर्षीच आयपीओ येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या इश्यूमध्ये सुमारे 2.5 टक्के हिस्सा विकला जाऊ शकतो आणि हा हिस्सा विक्री भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.

यामध्ये 4 अब्ज डॉलरपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 37,000 कोटी रुपये उभारले जाऊ शकतात. जिओकडे सध्या 50 कोटींहून अधिक ग्राहकांचा आधार असून बाजारात या आयपीओची आतुरतेने प्रतीक्षा आहे. गुंतवणूक बँक जेफ्रीजने गेल्या वर्षी जिओचे मूल्यांकन अंदाजे 180 अब्ज डॉलर इतके केले होते, तर आता काही बँकर्स 200 ते 240 अब्ज डॉलरपर्यंतचे मूल्यांकन सांगत आहेत. या मूल्यांकनानुसार केवळ 2.5 टक्के हिस्सा विक्री झाली तरी हा इश्यू गेल्या वर्षी ह्युंदाई मोटर इंडियाच्या 27,000 कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकणार आहे. मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये जिओची लिस्टिंग 2026 च्या पहिल्या सहामाहीत होऊ शकते, असा इशारा दिला होता आणि अंतिम निर्णय बाजारस्थिती पाहून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान बाजार नियामक सेबीने मोठ्या कंपन्यांसाठी आयपीओच्या वेळी किमान हिस्सा विक्रीचा नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या 5 टक्क्यांऐवजी 2.5 टक्के हिस्सा विकण्याची मुभा देण्याबाबत अर्थ मंत्रालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे आणि रिलायन्स याच बदलाकडे उत्सुकतेने पाहत आहे. कमी हिस्सा विकल्यामुळे शेअर्सची मागणी मजबूत राहील, असा कंपनीचा हेतू असल्याचे समजते. मॉर्गन स्टॅनली आणि कोटक महिंद्रा बँक जिओच्या आयपीओसाठी मसुदा लाल कागदपत्रे तयार करण्याचे प्राथमिक काम सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे.

जिओच्या आयपीओमुळे केकेआर, सिल्वर लेक, गुगल यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांना आपला काही हिस्सा विकून नफा बुक करण्याची आणि बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. दूरसंचार सेवांबरोबरच जिओने डिजिटल सेवा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातही वेगाने पावले टाकली असून एनव्हिडियासोबत भागीदारी करून एआय पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला आहे. सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात जिओची स्पर्धा एलन मस्कच्या स्टारलिंकसोबत होण्याची शक्यता असून भारतातील डिजिटल आणि ब्रॉडबँड बाजारपेठेत नवे परिदृश्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande