सफाळे पोलीसांची कामगिरी; अवघ्या काही दिवसांतच केळवे रोडवरील घरफोडीचा लावला
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)। सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील केळवे रोड (पूर्व) येथील देवीपाडा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत सफाळे पोलिसांनी छडा लावत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपी
सफाळे पोलीसांची दमदार कामगिरी; अवघ्या काही दिवसांतच केळवे रोडवरील घरफोडीचा लावला


पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।

सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील केळवे रोड (पूर्व) येथील देवीपाडा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत सफाळे पोलिसांनी छडा लावत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांच्या तत्पर तपासामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

शुक्रवार २ जानेवारी रोजी मध्यरात्री देवीपाडा येथील जागमाता मंदिराजवळ राहणारे मजूर विमल कुमार छोटेलाल पासवान (वय ३८) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने खिडकी तोडून प्रवेश केला. घरातून आयटेल कंपनीचे दोन मोबाईल फोन (किंमत सुमारे १८ हजार रुपये) तसेच सुमारे ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनेनंतर फिर्यादीने सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हारुन कादर शेख (वय २३, रा. पालघर) यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र व दोन मोबाईल फोन असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर, सहा. फौजदार सचिन महापदी, पोलीस हवालदार कल्पेश किणी, नीरज शुक्ला व शिवाजी चिमकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

सफाळा पोलिसांच्या या त्वरित व प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande