अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाईचा इशारा; पालक व शाळांना सफाळा पोलिसांचे आवाहन
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)। सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक शाळा व शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दुचाकी व चारचाकी वाहने चालविली जात असल्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहेत. १८ वर्षे पूर्ण न झालेली तसेच वाहन चालविण्य
अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाईचा इशारा; पालक व शाळांना सफाळा पोलिसांचे कडक आवाहन


पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।

सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक शाळा व शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दुचाकी व चारचाकी वाहने चालविली जात असल्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहेत. १८ वर्षे पूर्ण न झालेली तसेच वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना पालकांकडूनच मुलांना वाहने देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून ही बाब अत्यंत गंभीर व कायद्याचे सरळ उल्लंघन करणारी असल्याचे सफाळे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन मुलांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास यापुढे थेट पालकांना जबाबदार धरले जाणार असून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदर प्रकरणांमध्ये मोटार वाहन कायदा कलम ३, ४ व ५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १८० व १८१ आणि किशोर न्याय (JJ) कायदा कलम १८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अल्पवयीन मुलाने ५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास तब्बल २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो. यासोबतच चालक, वाहनमालक व पालकांना तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होण्याचीही तरतूद आहे.

अपघात झाल्यास संबंधित वाहनाचा विमा दावा नाकारला जाण्याची शक्यता असून गुन्हा नोंद झाल्यास त्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यातील नोकरी, पासपोर्ट, चारित्र्य प्रमाणपत्र आदी बाबींवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच दंडात्मक कारवाई झाल्यास २५ वर्षे वयापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही आणि संबंधित वाहनाची नोंदणी एक वर्षापर्यंत रद्द केली जाऊ शकते.

या पार्श्वभूमीवर सफाळे व पालघर पोलीस प्रशासनाने सर्व पालकांना कळकळीचे आवाहन केले आहे. अल्पवयीन पाल्यांच्या ताब्यात कोणतेही वाहन देऊ नये, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच वाहनाऐवजी सायकल किंवा ई-सायकलसारखे सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande