

नाशिक, 12 जानेवारी (हिं.स.)।
- नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे रविवार दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित ३५ वर्षे आणि त्यावरील विविध नऊ वयोगटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध गटांचे सामने पार पडले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील केन्सिंगटन क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये आज पुरुषांच्या ६० वर्षे वरील गटामध्ये एकेरी प्रकारात अंतिम लढतीत मुंबई उपनगरच्या मुरली सुब्रमण्यम यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गुरुमितसिंघ मथारू यांचा २१-१४ , २१-०६ असा सेटमध्ये करून या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले.
महिलांच्या गटात ५५ वर्षे गटात एकेरी प्रकारात अंतिम लढत चांगलीच चुरशीची झाली. मुंबई उपनगरच्या कविता जैन आणि पुणेच्या संजीवनी महाजन यांचात खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या लढतीत संजीवनी यांनी पहिला सेट २१-१८ असा जिंकून आघाडी घेतली. तर दुसऱ्या सेटमध्ये कविता यांनी जोमाने खेळ करत हा सेट २१-०६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये ५-५ अश्या बरोबरीनंतर कविता यांनी काही वेळा नेटजवळ ड्रॉप्स टाकत तर काही जोरदार शॉट्स लगावत या सेटवर आपले वर्चस्व राखत हा सेट २१-१२ असा जिंकून या गटाचे एकेरीचे विजेतेपद पटकावले.
महिलांच्या ६० वर्षे गटामध्ये एकेरीमध्ये मुंबई उपनगरच्या सुरेखा साटम आणि ठाणेच्या प्रेरणा साधणकर यांच्यातील अंतिम सामनाही फारच रंगला. यामध्येही प्रेरणा यांनी पहिला सेट २१-१७ असा जिंकून १-० अशी आघाडी प्रस्थापित केली. दुसऱ्या सेटमध्येही १८-१८ अशी बरोबरी होती. त्यानंतर मात्र मुंबईच्या सुरेखा यांनी संयमाने खेळ करत दोन गुण मिळवत आघाडी मिळविली. हेच लय कायम राखत त्यांनी हा सेट २१-१९ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये सुरेखा यांनी कधी नेटजवळ तर कधी खोलवर शटल ड्रॉप करतप्रेरणा यांना झुंजवले आणि हा सेट २१-१४ असा आपल्या नावे करत या गटाचे एकेरीचे विजेतेपद मिळविले.
पुरुषांच्या ६५ वयोगटात मुंबई उपनगरच्या दिलिप सुखटणकर, पुणेच्या मनोहर जोशी, अनिल भंडारी आणि सुनील पुंडलिक यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुषांच्या ७० वर्षे गटामध्ये किशोर वानखडे (वर्धा), नरेंद्र मातंगे (मुंबई उपनगर), शरद महाजन (नागपूर) आणि संजय पारधे (पुणे) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुषांच्या ७० वर्षे गटामध्ये ८३ वर्षे वयाचे आनंद घाटे (पुणे) आणि ठाणेचे दामोदर ठोंबरे वय वर्षे ८२ यांनी घेऊन खेळाला वय नसते तर जिद्द्दीने सराव करून आपल्याला तंदुरुस्त कसे ठेवावे याचे जणू धडे दिले.
या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे यांच्या जस्ट आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिकृत नियमावलीनुसार खेळविल्या जात आहेत.
या स्पर्धेला योनेक्स सनराईस यांनी पुरस्कृत केले आहे.
या स्पर्धाच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लाखनी, कार्याध्यक्ष शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष मंगेश काशीकर, राज्य सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष सुधीर गाडगीळ, पंकज ठाकूर, ओंकार हजारे, मुंबईचे सचिन भारती, नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव पराग एकांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सहसचिव दिलीप लोंढे, खजिनदार समीर रहाळकर,कार्यकारी सदस्य चंदन जाधव, संदीप म्हात्रे आदी परिश्रम घेत आहेत. याचबरोबर डॉ. सुचिता बच्छाव, अश्विन सोनावणे, विशाल शाह, उदय एकांडे, प्रमोद रानडे, अनंत जोशी, रिषभ गोलिया, आदित्य आर्डे, हर्षद टेम्बुर्णीकर आदी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
*आजचे निकाल :- अंतिम सामने :- निकाल*
महिला एकेरी - १) ५५ वर्षे - कविता जैन (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध संजीवनी महाजन (पुणे)
२) ६० वर्षे - सुरेखा साटम (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध प्रेरणा साधनकार (ठाणे)
पुरुष एकेरी - १) ६० वर्षे - १)मुरली सुब्रम्हन्यम (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध गुरमितसिंघ माथरू (छत्रपती संभाजीनगर)
२) ६५ वर्षे - १) दिलीप सुकथनकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध अनिल भंडारी (पुणे)
*उद्या दिनांक १३ जानेवारी रोजी होणारे सामने*
पुरुष एकेरी - ७० वर्षे - १) किशोर वानखडे (वर्धा) विरुद्ध शरद महाजन (नागपूर)
पुरुष दुहेरी - १) ६० वर्षे - १) मानेक दारूवाला आणि रेमंड रॉड्रीगेस (मुंबई उपनगर) विरुद्ध भ्रमर सेंगर आणि गुरमीत मेथारू (नाशिक आणि छ. संभाजीनगर)
२) ६५ वर्षे - १) दिलीप सुकथनकर आणि मिलिंद पूर्णपात्रे (मुंबई उपनगर) विरुद्ध गौतम आशरा आणि महेश आरस (मुंबई शहर)
३) ७० वर्षे - १) राजेंद्र बेदमुथा आणि राजीव वैश्यपायन (नाशिक आणि ठाणे ) विरुद्ध संजय परांडे आणि शरद महाजन (पुणे आणि नागपूर)
महिला दुहेरी होणारे उपांत्य सामने - १) ५५ वर्षे - १) नीना बाजपेयी आणि रितू अरोरा (ठाणे) विरुद्ध दीपाली जोशी आणि राजश्री भावे (पुणे)
मिश्र दुहेरी - १) ५५ वर्षे - १) श्रीकांत सृष्टी आणि कविता जैन (पुणे आणि मुंबई सब ) विरुद्ध अविनाश गोडे आणि दीपाली जोशी (ठाणे आणि पुणे)
२) ६० वर्षे - १) सुरेश आय्यप्पन आणि सुरेश साटम (पुणे आणि मुंबई उपनगर) विरुद्ध जयदीप साठे आणि प्रेरणा साधनकार (नागपूर आणि ठाणे)
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV