
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)।
हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या २६व्या सिकाई राष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये रायगड–ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत घवघवीत यश संपादन केले. देशभरातील नामांकित खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत रायगड–ठाण्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण पाच रौप्य पदके व एक कांस्य पदक पटकावले असून महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
अठरा वर्षांखालील वयोगटात शिव देवजी हिलम आणि शादाब इम्तियाज खान यांनी दमदार खेळ करत रौप्य पदकांची कमाई केली. याच गटातील यश जयेंद्र शिंदे यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत कांस्य पदक मिळविले. या युवा खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, शिस्तबद्ध खेळ आणि तांत्रिक कौशल्य यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले.
अठरा वर्षांवरील वरिष्ठ गटात शुभम महेंद्र नखाते, सौरभ संतोष भगत आणि परमेश नागेश केठवत यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत रौप्य पदके पटकावली. वरिष्ठ गटातील खेळाडूंच्या यशामुळे संघाच्या कामगिरीला अधिक बळ मिळाले. या यशामागे प्रशिक्षक विजय तांबटकर, प्रियंका गुंजाळ आणि इम्तियाज खान यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच महाराष्ट्र सिकाई असोसिएशनचे अध्यक्ष मजर खान आणि सचिव रवींद्र गायकी यांचेही मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन खेळाडूंना लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल रायगड–ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील सिकाई खेळाला नवी दिशा मिळाली असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश मिळविण्याचा आत्मविश्वास खेळाडूंमध्ये निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके