
नवी दिल्ली, १२ जानेवारी (हिं.स.) मेलबर्नमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या ड्रॉ पूर्वी सोमवारी एटीपी रँकिंग जाहीर करण्यात आली. स्पेनचा कार्लोस अल्कारज आणि इटलीचा यानिक सिन्नर यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम ठेवले आहे. गुरुवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या ड्रॉसाठी ही रँकिंग वापरली जाणार आहे.
गेल्या चार ग्रँडस्लॅममध्ये झालेल्या ड्रॉप्रमाणेच अल्कारज आणि दोन वेळा गतविजेता सिन्नर यांना ड्रॉच्या वेगवेगळ्या भागात स्थान देण्यात येईल. मनोरंजक म्हणजे, या हंगामात दोन्ही टेनिसपटूंनी आतापर्यंत एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. पण शनिवारी दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात ते एकमेकांसमोर आले होते.
इतर मोठ्या बदलांमध्ये कझाकस्तानचा अलेक्झांडर बुब्लिक हा हाँगकाँग ओपन जिंकल्यानंतर पहिल्यांदाच एटीपी टॉप-१० मध्ये दाखल झाला. त्याने अंतिम फेरीत इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. २८ वर्षीय बुब्लिकने त्याच्या कारकिर्दीतील नववे विजेतेपद जिंकले आणि एका स्थानाने झेप घेऊन १० व्या क्रमांकावर पोहोचला. अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला तरी, मुसेट्टीला फायदा झाला आणि त्याने दोन स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक ५ वर पोहोचला. त्याने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलियासिमेकडून हे स्थान हिसकावून घेतले.
ब्रिस्बेनमध्ये कारकिर्दीतील २२ वे विजेतेपद जिंकणारा डॅनिल मेदवेदेव एका स्थानाने वर जाऊन १२ व्या क्रमांकावर पोहोचला. दरम्यान, उपविजेता ब्रँडन नाकाशिमा चार स्थानांनी पुढे जाऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम २९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे