अ‍ॅपल–गुगल मध्ये करार; सिरी होणार अधिक स्मार्ट
मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.)। अ‍ॅपलने आपल्या अपग्रेडेड सिरीसाठी गुगलच्या जेमिनी एआय मॉडेल्सचा वापर करण्याचा बहुवर्षीय करार जाहीर केला असून ही भागीदारी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही टेक दिग्गजांसाठी नवी दिशा ठरू शकते. जाहीर झालेल्या या क
Apple and Google  deal


मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.)। अ‍ॅपलने आपल्या अपग्रेडेड सिरीसाठी गुगलच्या जेमिनी एआय मॉडेल्सचा वापर करण्याचा बहुवर्षीय करार जाहीर केला असून ही भागीदारी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही टेक दिग्गजांसाठी नवी दिशा ठरू शकते.

जाहीर झालेल्या या करारानुसार गुगलचे जेमिनी मॉडेल्स आणि क्लाउड तंत्रज्ञान अ‍ॅपलच्या नव्या फाऊंडेशन मॉडेल्सना आधार देणार असून हे फीचर्स ‘अ‍ॅपल इंटेलिजन्स’मध्ये समाविष्ट केले जातील. यंदाच्या वर्षाअखेरीस येणाऱ्या अधिक वैयक्तिकृत आणि स्मार्ट सिरीमधून या तंत्रज्ञानाचे परिणाम प्रत्यक्ष दिसतील.

सॅमसंगच्या गॅलेक्सी एआयमध्ये जेमिनी आधीपासून वापरले जात असले तरी अ‍ॅपलच्या दोन अब्जांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह डिव्हाइसेसमुळे गुगलसाठी ही मोठी बाजारपेठ ठरणार आहे. अ‍ॅपलनं अनेक पर्यायांचा अभ्यास करून जेमिनीची निवड केली असून तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण अ‍ॅपलकडेच राहील, तसेच एआय मॉडेल्स ऑन-डिव्हाइस किंवा प्रायव्हेट क्लाउड कंप्यूट इन्फ्रास्ट्रक्चरवर चालवले जाणार असल्याने प्रायव्हसीवरील कंपनीची भूमिका कायम राहील.

आर्थिक तपशील जाहीर करण्यात आले नसले तरी अहवालांनुसार अ‍ॅपल गुगलला दरवर्षी जवळपास एक अब्ज डॉलर्स देऊ शकते. सिरी प्रतिस्पर्धी असिस्टंट्सच्या मागे पडल्याची टीका आणि एआयमध्ये अ‍ॅपलची सावध भूमिका याच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात असून जेमिनीच्या मदतीने सिरीला मोठं अपग्रेड देण्याची कंपनीची तयारी आहे.

अ‍ॅपल ओपनएआयच्या चॅटजीपीटीसोबतही काम करत असलं तरी जेमिनी आणि चॅटजीपीटी एकत्र कशा पद्धतीने वापरले जातील हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, गुगलनं जेमिनी 3 मॉडेल लाँच करून क्लाउड व्यवसायातही नवे करार केले आहेत. या भागीदारीमुळे सिरीच्या दैनंदिन वापरात लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अ‍ॅपलच्या एआय धोरणाला नवी गती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande