
पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)। : महिंद्राच्या ट्रक आणि बस व्यवसाय विभागाने आपल्या अत्यंत यशस्वी व प्रसिद्ध अशा ‘महिंद्रा सारथी अभियान’ या सीएसआर उपक्रमाची बारावी आवृत्ती सुरू होत असल्याची घोषणा आज येथे केली. उपक्रमाच्या या टप्प्यात, ज्या ट्रकचालकांच्या मुली इयत्ता दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत, त्यांना प्रत्येकी १०,००० रुपयांच्या आणखी १,००० शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे.
आपल्या मुलींना जीवनात पुढे जाण्यासाठी समान संधी मिळावी यासाठी जे ट्रकचालक प्रयत्नशील असतात आणि दहावीनंतरही मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्यास जे प्रोत्साहन देतात, त्यांच्या असामान्य जिद्दीला आणि धैर्याला सलाम करण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करून पात्र ठरणाऱ्या ट्रक चालकांच्या मुलींना सन्मानित करणाऱ्या पहिल्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांपैकी महिंद्रा ही एक आहे. या उपक्रमाची सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली होती. या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ट्रक चालकांच्या मुलींची निवड देशभरातील ७५पेक्षा अधिक वाहतूक केंद्रांवर (ट्रान्सपोर्ट हब्स) राबवण्यात येणाऱ्या विशेष संपर्क कार्यक्रमाद्वारे केली जाईल. ही निवड प्रक्रिया स्पष्ट, पारदर्शक आणि स्वतंत्र स्वरूपाची असेल. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत एकूण ११,०२९ मुलींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
महिंद्रा समूहातील ट्रक्स, बसेस व कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट या विभागाचे प्रमुख आणि ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य विनोद सहाय या संदर्भात म्हणाले, “महिंद्रा सारथी अभियानाच्या माध्यमातून आम्ही केवळ शिष्यवृत्ती देत नाही, तर मुलींसाठी उज्ज्वल भविष्यासाठीचे दरवाजे उघडतो. त्यांच्या मनात आम्ही आशेचा दीप प्रज्वलित करीत आहोत आणि त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करून सक्षम महिलांची एक पिढी घडवीत आहोत. हीच पिढी आपल्या समाजासाठी आणि एकूणच अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.”
या प्रसंगी बोलताना, महिंद्रा समूहातील ट्रक्स, बसेस व कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड डॉ. वेंकट श्रीनिवास म्हणाले, “महिंद्रा सारथी अभियानाद्वारे आम्ही समाजाप्रती आमची सातत्यपूर्ण बांधिलकी दर्शवीत आहोत. यातून आम्ही केवळ ट्रक चालकांच्या मुलींना सक्षम करत नाही, तर नव्या संधी आणि प्रेरणेची संस्कृती निर्माण करतो. या उपक्रमातून त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करण्याची आमची कटिबद्धता दिसून येते. प्रत्येक मुलीला तिची क्षमता पूर्णत्वास नेण्याचे स्वप्न पाहता यावे आणि ती उद्याचे नेतृत्त्व करणारी व्यक्ती व्हावी, असा अधिक सक्षम, अधिक समतावादी समाज घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या प्रत्येक मुलीच्या बॅंक खात्यात १०,००० रुपये थेट जमा करून, तसेच तिच्या या यशाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन कंपनीकडून तिला गौरविण्यात येईल. महिंद्रा ट्रक अँड बस या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत निवडक ठिकाणी १,००० मुलींच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर